"आमच्यावेळी सीता अशी..." क्रिती सेननच्या 'त्या' व्हिडिओवर दीपिका चिखलिया यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 09:32 AM2023-06-09T09:32:04+5:302023-06-09T09:33:30+5:30
टेलिव्हिजनवर 'रामायण' ही मालिका प्रचंड गाजली होती.
गेल्या काही दिवसांपासून ओम राऊत (Om Raut) यांच्या 'आदिपुरुष' (Adipurush) सिनेमाची चर्चा आहे. प्रभास (Prabhas) प्रभू श्रीरामाच्या तर क्रिती सेनन (Kriti Sanon) सीतेच्या भूमिकेत दिसत आहे. रामायणावर हा सिनेमा आधारित आहे. ओम राऊत यांच्यासह प्रभास आणि क्रिती प्रमोशनमध्ये व्सस्त आहेत. कालच क्रिती सेननच्या एका व्हिडिओवर जोरदार टीका झाली. तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर ओम राऊतने क्रितीला बाय म्हणताना गालावर किस केले. धार्मिक स्थळी अशा प्रकारे वागणं गरजेचंच आहे का असा सवाल उपस्थित केला गेला. या प्रकरणावर आता अभिनेत्री दीपिका चिखलिया (Deepika Chikhliya) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
टेलिव्हिजनवर 'रामायण' ही मालिका प्रचंड गाजली होती. अभिनेत्री दीपिका चिखलिया यांची मालिकेत सीतेची भूमिका गाजली होती. लोक खरंच त्यांना माता सीताच समजायला लागले होते. क्रिती सेननच्या त्या व्हिडिओवर दीपिका म्हणाल्या, "आजकालच्या कलाकारांचा प्रॉब्लेमच आहे ते आपलं पात्र जगतच नाहीत त्यातील भावना समजूनच घेत नाहीत. क्रिती नव्या पिढीची अभिनेत्री आहे. आजकाल किस आणि मिठी मारणं खूपच कॉमन झालंय. तिने कधी स्वत:ला सीता समजलंच नाही. ही प्रत्येकाची भावना असते. मी सीतेचं पात्र जगले आहे तर आजकालच्या अभिनेत्री केवळ एक काम म्हणून त्याकडे बघतात. फिल्म पूर्ण झाली की त्यांना काही फरक पडत नाही."
त्या पुढे म्हणाल्या, "आमच्या वेळी सेटवर आमचं नाव घेण्याचीही कोणाचीही हिंमत नव्हती. मी जेव्हा सीतेची भूमिका साकारत होते तेव्हा सेटवरील अनेक लोक येऊन पाया पडायचे. तो काळच वेगळा होता. तेव्हा आम्हाला कलाकार नाही तर देवच समजायचे. आम्ही तर कोणाला किस करणं दूरची गोष्ट आहे मिठीही मारत नव्हतो. आदिपुरुषचे कलाकार नंतर दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्सस्त होतील आणि या पात्रांना विसरुनही जातील. आम्हाला लोक देवच समजत होते त्यामुळे आम्ही त्यांच्या भावना दुखावतील असं कधीच वागलो नाही."