'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम रोशन सिंग सोढी म्हणजेच अभिनेते गुरुचरण सिंग (Gurucharan Singh) गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता आहेत. 22 एप्रिल रोजीच ते दिल्ली येथील घरातून एअरपोर्टसाठी निघाले होते. विमानाने ते मुंबईला येणार होते. मात्र ते ना विमानात बसले आणि ना पुन्हा दिल्लीतील घरी गेले. गुरुचरण बेपत्ता झाल्याची तक्रार वडिलांनी दाखल केली. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. नुकतंच पोलिसांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी केस दाखल करुन घेतली आहे. तपासातून CCTV फुटेजही समोर आले. दक्षिण पश्चिम दिल्लीचे डीसीपी रोहित मीना म्हणाले," गुरुचरण सिंग यांच्या कुटुंबाने तक्रार दाखल केली आहे. २२ एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजता ते मुंबईसाठी निघाल्याचं त्यांनी नमूद केलं. आम्ही केस रजिस्टर केली आहे आणि सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास केला आहे. आम्ही फुटेज आणि टेक्निकल तपास केला. त्यातून काही महत्वाचे क्लू मिळाले आहेत. कलम 365 अंतर्गत केस दाखल केली आहे. प्राथमिक चौकशीतून गुरुचरण यांची हालचाल CCTV मधून पाहिली आणि यातून पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न केले. सोबत एक बॅगपॅक घेऊन ते जाताना दिसले."
गुरुचरण सिंग यांचं वय 50 वर्ष आहे. त्यांच्या आईची तब्येत बिघडल्याने ते दिल्लीला गेले होते. सध्या त्यांचं कुटुंब गुरुचरण यांच्या वाट पाहत आहेत. पोलिसांनी त्यांना अभिनेत्याला शोधून काढण्याचं आश्वासन दिलं आहे. काही वर्षांपूर्वीच गुरुचरण यांनी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका सोडली होती.