Join us

बायोपिक बनविण्याची इच्छा.....पण पैसा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2016 3:42 AM

सध्या बॉलीवुडला बायोपिकने घेरलेले दिसत आहे. नुकताच भाग मिल्खा भाग, नीरजा यासारखे बायोपिकनी बॉक्सआॅफीसवर राज्य केले आहे. तर सुलतान, ...

सध्या बॉलीवुडला बायोपिकने घेरलेले दिसत आहे. नुकताच भाग मिल्खा भाग, नीरजा यासारखे बायोपिकनी बॉक्सआॅफीसवर राज्य केले आहे. तर सुलतान, रईस, सचिन ए बिलीयन ड्रिम्स हे बायोपिक प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. एक नजर टाकली असता सध्या बॉलीवुडवर बायोपिकने कब्जा केलेला दिसत आहे. पण हिंदी बायोपिक चित्रपटाच्या तुलनेत मराठी बायोपिक चित्रपटाचे प्रमाण खूप कमी आहे. आत्तापर्यंत प्रदर्शित झालेल्या मराठी बायोपिक्स चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिलेला आहे. परंतु पैशांच्या अभावी अशा प्रकारचे चित्रपट प्रेक्षकापर्यंत पोहचवू शकत नाही अशी खंत काही आघाडीच्या दिग्दर्शकांनी लोकमत सीएनएक्सशी बोलताना व्यक्त केली. त्याचा हा घेतलेला आढावा.    मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेल्या देऊळ या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रविण तरडे म्हणाले, बायोपिक करण्याचे स्वप्न प्रत्येक दिग्दर्शकाचे असते. पण आर्थिक बाजू लक्षात घेता बायोपिक करणे सोपे नाही. अशा चित्रपटांसाठी कल्पनेला वाव नसतो. कारण जे घडले आहे ते मांडावे लागते. त्यामुळे त्या व्यक्तीशी संबंधित तो जुना काळ, काश्च्युम, कॅमेरा पूर्णपणे अशी भौतिक जबाबदारी घ्यावी लागते. त्यासाठी पैसादेखील भरपूर लागतो. आर्थिक बजेट लक्षात घेता मराठी इंडस्ट्रीमध्ये बायोपिक करणे सोपे नाही. पण तरी ही आपल्याकडे लोकमान्य एक पुरूष, यशवंत राव चव्हाण, बालगंधर्व, सावरकर यांसारख्या दिग्गजांवर उत्तमरीत्या बायोपिक बनविले गेले आहेत. माझी स्वत:ची देखील खूप इच्छा आहे बायोपिक बनविण्याची कारण महाराष्ट्रात खूप सारे दिग्गज सामाजिक कार्यकर्ते,राजकीय व्यक्ती आहेत. तसेच मला स्वत:ला महात्मा फुले, विखे, गोखले यांसारख्या सामाजिक कार्यकर्त्यावर बायोपिक बनविण्याची खूप इच्छा आहे. पण खर्चाचे वर्तुळ पाहता ते कधी सत्यात उतरेल हे सांगता येत नाही. नुकताच प्रदर्शित झालेला रेती या चित्रपटाचे दिग्दर्शक सुहास भोसले यांच्या मते, बायोपिक बनविण्याचा कालावधी खूप मोठा असतो. आणि त्यासाठी आर्थिक पाठबळ देखील मजबूत असावे लागते. एखदा माझ्या जवळच्या मित्राने एका कांदबरीवरून  बायोपिक करण्याचे ठरविले होते.पण त्याचा खर्च काढला असता, तो पोहोचला दहा ते बारा करोंडवर. एवढा पैसा खर्च करणे अशक्य आहे. तसेच तो मांडला तर प्रेक्षकांपर्यत पोहोचविण्याचे बजेटदेखील अमाप असते. त्याचबरोबर मराठी चित्रपट हा महाराष्ट्रापुरताच मर्यादित असतो. बॉलिवुडसारखा त्याला प्रेक्षक वर्ग देशभरातून लाभलेला नाही हा देखील विचार करण महत्वाचा आहे. तसेच आपल्याकडे ही खूप साºया दिग्दर्शकांची इच्छा, स्वप्न आहेत बायोपिक बनविण्याची पण आर्थिक गणिताची अडचण असल्यामुळे मराठी इंडस्ट्रीतील दिग्दर्शकाची ही इच्छा पूर्ण होत नाही. पण तरी ही त्यापलीकडे जाऊन मराठी इंडस्ट्रीमध्ये डॉ. प्रकाश बाबा आमटे, सिंधूताई सकपाळ, लोकमान्य एक युगपुरूष यासारखे ताकदीचे चित्रपटांनी मराठी प्रेक्षकांवर राज्य केले आहे. तसेच महाराष्ट्रात ताकदीचे खूप सारे कलावंत, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर बायोपिक करण्याची इच्छा आहे.   कॉफी आणि बरचं काही या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे म्हणाले की, सेट, त्या प्रकारची स्टाईल, तसे लोकेशन, बजेट या गोष्टींचा विचार केला तर बायोपिक बनविण्याचा खर्च अवाढव्य असतो. विचार करा १९८९ चे रस्ते, बसेस, गाडया घेऊन एक सीन आजच्या महागाईेच्या काळात करायचा असेल तर जवळजवळ दहा लाख रूपये खर्च येतो. एका सीनसाठी इतका अमाप खर्च करणे शक्य नाही.आणि त्यात मराठी इंडस्ट्रीमध्ये बायोपिक यशस्वी होण्याची शाश्वती देखील नसते. त्यामुळे इच्छा असतानादेखील खर्चा अभावी बायोपिक बनविण्याचे स्वप्न कित्येक दिग्दर्शकांचे अधुरे राहतेबायोपिक असणारे चित्रपट हे मोठे बजेट असणारे असतात. मराठी इडस्ट्रीमध्ये असे चित्रपट येवून गेले आहेत. जर तुम्हाला एखादे दिग्गज व्यक्तीमहत्व घेऊन बायोपिक करायची असेल तर पैसा हा प्रश्न उभा राहू शकत नाही.                        गजेंद्र आहिरे (दिग्दर्शक)   बॉलीवुडची बायोपिकची क्रेझ पाहता मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील असे चित्रपट यावे हे महत्वाचे नाही. पण जेवढे चित्रपट येऊ पाहत आहे  ते चांगले व सशक्त कथा असणारे पाहिजे हे सगळयात महत्वाचे आहे.                                  नागराज मंजुळे (दिग्दर्शक)