स्टार प्रवाहवरील ‘उदे गं अंबे...कथा साडेतीन शक्तिपीठांची’ मालिकेची चांगलीच चर्चा आहे. या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. महाराष्ट्राची श्रद्धास्थानं असलेल्या साडेतीन शक्तीपिठांची अभुतपूर्व गोष्ट भव्यदिव्य मालिकेच्या माध्यमातून सादर करण्याचा स्टार प्रवाह वाहिनीचा प्रयत्न आहे. शक्तीरुप असलेल्या देवी सती आणि शिवशंकराच्या कथेपासून या मालिकेची सुरुवात झाली आहे. महादेव आणि सती यांचा विवाहसोहळा नुकताच प्रेक्षकांनी अनुभवला. पण आता मालिकेच्या पुढील भागात भगवान शंकरांचा वीरभद्र अवतार पाहायला मिळणार आहे.
शंकराचा वीरभद्र अवतार
सतीचे पिता अर्थात दक्षराजांनी यज्ञासाठी सर्व देवतांना आमंत्रित केले मात्र महादेवांना आमंत्रित केले नाही. महादेवांचा अपमान सहन न झाल्यामुळे देवी सतीने अग्नीकुंडात उडी घेऊन देहत्याग केला. भगवान शिवशंकरांना हे कळताच ते क्रोधीत झाले आणि त्यांनी वीरभद्र अवतार धारण केला. दक्षराजाचा यज्ञ सफल होऊ न देण्यासाठी शिवशंकरांनी वीरभद्र अवतार धारण केल्याची माहिती पुराणात आढळते. वीरभद्राचं हे रौद्ररुप सृष्टीचा विनाश करत होतं. सृष्टीचा विनाश कसा रोखला गेला आणि साडे तीन शक्तिपीठांची निर्मिती कशी झाली? याची उत्कंठावर्धक गोष्ट उदे गं अंबे मालिकेच्या यापुढील भागांमधून उलगडणार आहे.
देवदत्त नागे याविषयी काय म्हणाले?
वीरभद्र या अवताराविषयी सांगताना अभिनेते देवदत्त नागे म्हणाले, ‘वीरभद्र हे महादेवांचं रुप आहे. सतीपुढे जसे ते भोळेसाम होते अगदी त्याउलट तिचा विरह सहन न झाल्यामुळे त्यांनी रौद्रावतारही धारण केला. अभिनेता म्हणून हे रुप साकारणं माझ्यासाठी अतिशय आव्हानात्मक होतं. महादेवांपुढे नतमस्तक होऊन मी हे रुप साकारलं. वीरभद्राचं अक्राळविक्राळ रुप साकारण्यासाठी दोन अडीच तास मेकअपसाठी लागत होते. नखशिखांत नीळ्या रंगात मी दोन दिवस वावरत होतो. बरेच ॲक्शन सीन्स असल्यामुळे पोटतिडकीने मोठ्या आवाजात संवाद बोलावे लागत होते. महादेवांनीच माझ्याकडून हे करवून घेतलं असं मी म्हणेन.’ 'उदे गं अंबे...कथा साडेतीन शक्तिपीठांची' मालिका सायंकाळी ६.३० वाजता स्टार प्रवाहवर बघायला मिळेल.