Join us

देवदत्त नागेने केली सीएनएक्स मस्तीच्या वाचकांसोबत धमाल मस्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2017 12:32 PM

जय मल्हार फेम देवदत्त नागेला भेटण्याची संधी लोकमतच्या सीएनएक्स या वेबसाईटने वाचकांना दिली होती. वाचकांना काही प्रश्न विचारण्यात आले ...

जय मल्हार फेम देवदत्त नागेला भेटण्याची संधी लोकमतच्या सीएनएक्स या वेबसाईटने वाचकांना दिली होती. वाचकांना काही प्रश्न विचारण्यात आले होते आणि या प्रश्नाची अचूक उत्तरे देणाऱ्या भाग्यशाली विजेत्यांना देवदत्तला भेटण्याची संधी देण्यात आली होती. या स्पर्धेत हजारो लोकांनी भाग घेतला असून त्यातून काही वाचकांची निवड करण्यात आली होती आणि लोकमतच्या ऑफिसमध्ये देवदत्त आणि या वाचकांची भेट घडवून देण्यात आली.देवदत्तला भेटायला महाराष्ट्राच्या विविध भागातून लोक आले होते. तसेच अमराठी लोकदेखील या स्पर्धेत भाग घेऊन देवदत्तला भेटले. देवदत्तने त्याचे स्टारडम बाजूला ठेवून एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे त्यांच्याशी गप्पा मारल्या. देवदत्तने त्याचे अनेक खाजगी गोष्टी, जय मल्हार या मालिकेच्या चित्रीकरणाचा अनुभव अशा अनेक गोष्टी त्यांच्यासोबत शेअर केल्या. तसेच त्याने या लोकांच्या घरात कोण असते, ते काय करतात अशी आपुलकीने चौकशी केली. देवदत्तला बाईकचे प्रचंड वेड आहे. त्यामुळे देवदत्तने त्याला कोणकोणत्या बाइक आवडतात हे त्यांना सांगितले. पण त्याचसोबत बाइक चालवताना हॅल्मेट घाला. सुरक्षिततेचे सगळे मार्ग अवलंबवा असे आवर्जून सांगितले. खंडोबा या व्यक्तिरेखेमुळे देवदत्तच्या करिय़रला एक वेगळे वळण मिळाले. या मालिकेचे चित्रीकरण सुरू व्हायच्याआधी त्याने जेजुरीला जाऊन दर्शन घेतले होते. तसेच मालिकेच्या चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी देखील तो जेजुरीला दर्शनासाठी गेला होता असे त्याने सांगितले. मालिका सुरू असताना देखील तो अनेकवेळा जेजुरीला जात असे. पण तो रुमाल बांधून जात असल्याने लोकांना त्याला ओळखणे सुरुवातीला कठीण जात असे. पण काही दिवसांनंतर तो दर्शनासाठी रुमाल बांधून येतो हे लोकांना कळले होते. त्यामुळे रुमाल बांधलेला व्यक्ती दिसला की तो मीच आहे असे लोक लगेचच ओळखत असे असे तो सांगतो. या मालिकेमुळे त्याला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. लोक त्याला खंडोबा समजून आजही पाया पडतात असे तो सांगतो. देवदत्त अनेक वर्षांपासून व्यसनमुक्तीसाठी काम करत आहे. त्याने त्याला भेटायला आलेल्या लोकांना व्यसनमुक्ती विषयी सांगितले. मी माझ्या आयुष्यात कधीच कोणती दारू चाखली नाही की सिगारेट ओढली नाही याचा मला अभिमान आहे आणि माझ्या फॅन्सनेदेखील दारू, सिगारेट या व्यसनांच्या अधीन जाऊ नये असे मी त्यांना सांगेन. जय मल्हार ही भूमिका कशी मिळाली असे एका वाचकाने देवदत्त याला विचारले असता त्याने सांगितले, मनोज कोल्हटकर यांनी एकदा मला फोन करून माझे काही फोटो मागवले होते. पण एका नायकाच्या भूमिकेसाठी ते फोटो मागत असल्याने मी ते दिलेच नाही. मला नायक नव्हे तर खलनायकाची भूमिका साकारायची होती. त्यांनी मला तीन-चार वेळा फोन करून सुद्धा मी दुर्लक्ष केले. त्यामुळे शेवटी त्यांनीच फेसबुकवरून माझे काही फोटो घेतले आणि ते फोटो पाहून मला महेश कोठारे यांच्या ऑफिसमधून फोन आला. मी या भूमिकेसाठी ऑडिशन दिले आणि माझी या मालिकेसाठी निवड झाली. गेल्या तीन वर्षांपासून देवदत्त मालिका करत असल्याने त्याला आराम करायला वेळच मिळाला नाही आणि त्यातही तो त्याच्या फिटनेसच्या बाबतीत सतर्क असल्याने तो कितीही वाजता चित्रीकरण संपले तरी जिमला जात असे. यामुळे त्याला दिवसातून केवळ चार-पाच तासच झोपायला मिळत असे. पण चित्रीकरण संपल्यावर आता सात तास तरी झोपायचे असे त्याने ठरवले आहे. मालिका संपल्यावर तो या मालिकेच्या संपूर्ण टीमला मिस करतोय असे तो सांगतो.