महाभारताच्या पार्श्वभूमीवर एक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या मालिकेत छोट्या पडद्यावरचे अनेक प्रसिद्ध कलाकार पाहायला मिळणार आहेत. ‘कर्णसंगिनी’ या मालिकेत कर्ण आणि त्याची पत्नी उरुवी यांची अज्ञात कथा मांडण्यात आलेली आहे.
महाभारतातील राजकारण आणि युद्ध या प्रमुख कथेची माहिती सर्वांना असली, तरी या मालिकेत कर्णाच्या प्रेमकथेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ‘कर्णसंगिनी’ या मालिकेची निर्मिती भव्य प्रमाणावर केली जाणार असून त्यातून त्या काळातील भव्यता दिसून येणार आहे. तसेच गौतम गुलाटी, मदिराक्षी मुंडले यांसारखे एकापेक्षा एक दर्जेदार कलाकार या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत, हीसुद्धा या मालिकेची जमेची बाजू म्हणावी लागेल.
‘कर्णसंगिनी’ मालिकेद्वारे ‘स्टार प्लस’ वाहिनीने प्रेक्षकांपुढे पौराणिक प्रणय मालिकेचा नवा प्रकार सादर केला आहे. उरुवी ही क्षत्रिय राजकन्या आपल्यापेक्षा कनिष्ठ अशा सूत जातीत जन्मलेल्या कर्णाची आपला पती म्हणून निवड करते आणि त्यासाठी श्रेष्ठ धनुर्धर अर्जुनाबरोबरचा आपला ठरलेला विवाह मोडते. त्यामुळे समाज तिलाही वाळीत टाकतो, अशी या मालिकेची संकल्पना आहे. महाभारताच्या ज्ञात कथेपेक्षा अगदी वेगळी असली, तरी ‘कर्णसंगिनी’ची कथा आजच्या काळाशी अधिक सुसंगत असल्याने निर्मात्यांनी त्यासाठी नामवंत अभ्यासक देवदत्त पटनाईक यांची या मालिकेचे सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.
हिंदू पौराणिक साहित्याचे जाणकार आणि भाष्यकार असलेले आणि पौराणिक कथांचा संदर्भ आजच्या काळाशी जोडणारे अभ्यासक म्हणून देवदत्त पटनाईक प्रसिद्ध आहेत. म्हणूनच शशी आणि सुमीत मित्तल या निर्मात्यांनी त्यांना या मालिकेसाठी करारबद्ध केले आहे. या मालिकेच्या कथानकात पटनाईक आपल्याही काही सूचना सुचवितील. ही मालिका तयार करताना देवदत्त यांनी केलेल्या काही सूचना विशेष महत्त्वाच्या ठरल्याचे सांगून निर्माते म्हणाले की, त्यामुळे मालिकेच्या कथानकाचा दृष्टिकोन अधिक व्यापक होण्यास मदत होईल.
महाभारताच्या पार्श्वभूमीवर असली, तरी प्रेक्षकांना एका वेगळ्याच विषयावरील मालिका पाहण्यास मिळणार आहे. ‘कर्णसंगिनी’ ही मालिका लवकरच स्टार प्लसवर सुरू होत आहे.