Join us  

पत्र्याच्या घरात जन्म झाला, 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडचा संघर्ष, म्हणाला- "बाबा वॉचमॅनची नोकरी करायचे..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 10:35 AM

पत्र्याच्या घरात जन्म, वडील होते वॉचमॅन; किरण गायकवाडने सांगितला कठीण काळ

'लागिर झालं जी' मालिकेत खलनायिकाची भूमिका साकारून अभिनेता किरण गायकवाड घराघरात पोहोचला. या मालिकेतील भैय्यासाहेब या भूमिकेने त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर अनेक मालिकांमध्ये तो दिसला. 'देवमाणूस' या मालिकेने किरणला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. अभिनयाची उत्तम जाण असणाऱ्या किरणने प्रेक्षकांच्या मनात त्याचं स्थान निर्माण केलं आहे. पण, कलाविश्वात नाव कमावण्याचा त्याचा हा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या किरणने हलाखीच्या परिस्थितीतून वर येत स्वत:ची ओळख बनवली. 

किरण गायकवाडने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने फिल्मी करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबाबतही अनेक खुलासे केले. बालपणाबद्दल भाष्य करताना खरी जन्मतारीख माहीत नसल्याचा खुलासाही किरणने केला. तो म्हणाला, "माझ्या जन्माअगोदर आईवडील पुण्यात स्थायिक झाले होते. माझा जन्म घरी झाला आहे. गावाकडून माझे आईबाबा पुण्यात आले. बाबा एके ठिकाणी वॉचमॅनची नोकरी करत होते. एका पत्र्याच्या खोलीत माझा जन्म झाला. माझी जन्मतारीखही खरी नाहीये. आपल्याला मुलगा झाला, या आनंदातच माझे बाबा कित्येक महिने आणि वर्ष होते. त्यांची रोज पार्टी चालायची. आई निरक्षर असल्याने तिनेही नोंद केली नाही". 

"शाळेत जाण्यासाठी एक जन्मतारीख लागते. म्हणून माझी १२ जून ही जन्मतारीख आहे. कदाचित तो तोच दिवस असावा. मला खूप भारी वाटतं. नक्षत्र वगैरे असं माझं काहीच नाहीये. मी एक खुली किताब आहे. बालपणात खूप मजा केलीय. खूप आधीपासूनच सगळ्या गोष्टींची जाणीव होत गेली. त्यामुळेच कदाचित मी नीट वागायला लागलो", असं किरणने सांगितलं. 

'लागिर झालं जी', 'देवमाणूस' या मालिकांबरोबरच अनेक मालिकांमध्ये किरण झळकला आहे. मराठी सिनेमांमध्येही त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 'चौक', 'फकाट', 'बघतोस काय मुजरा कर' या सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. आता किरण 'डंका हरिनामाचा' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

टॅग्स :किरण गायकवाडटिव्ही कलाकारमराठी अभिनेतालागिरं झालं जी'देवमाणूस २' मालिका