अभिनेता मोहित रैनाने (Mohit Raina) 'देवो के देव महादेव' मालिकेत भगवान शंकराची भूमिका साकारत सर्वांचंच मन जिंकलं. प्रेक्षक त्याच्याकडे खरोखरंच शंकराचा अवतार म्हणून पाहू लागले इतकी त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली. काही दिवसांपूर्वीच तो बाबा झाला आहे आणि आयुष्यातील या नव्या टप्प्याचा आनंद घेत आहे. नुकतीच त्याने एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी त्याने वडील गेले त्याच दिवशी मालिकेत भूमिका मिळाल्याचं कन्फर्म झालं असा भावनिक खुलासा केला.
युट्यूबर रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत मोहितने कधीही न सांगितलेल्या अनेक गोष्टींवर भाष्य केलं. तो म्हणाला, 'मी कधीही यावर बोललो नाही. पण आज सांगतो, माझे वडील भगवान शंकराचे मोठे भक्त होते. ज्या दिवशी माझी देवो के देव महादेवमध्ये भूमिका कन्फर्म झाली त्याच दिवशी माझ्या वडिलांचं निधन झालं. मला असं वाटतं की महादेवाची भूमिका मला वडिलांनी दिलेलं गिफ्टच आहे. कदाचित म्हणूनच मी या मालिकेत सर्वोत्तम काम केलं.'
मोहित रैनाला आजही लोक शंकराच्या भूमिकेमुळेच ओळखतात. यानंतर त्याला अनेक सिनेमा आणि सिरीजची ऑफर आली. मोहित आगामी 'द फ्रीलान्सर' सीरिजमध्ये दिसणार आहे.