'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील वहिनीसाहेबांना आली चक्क निवडणूक लढवण्याची ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 02:19 PM2019-05-15T14:19:08+5:302019-05-15T14:33:58+5:30
रसिकांना नंदिनी वहिनीचा येणारा राग हीच धनश्रीच्या भूमिकेची पोचपावती म्हणावी लागेल. कतंच मालिकेत प्रेक्षकांनी नंदिता आणि पाठकबाई यांच्यामधील निवडणुकीची चुरस पाहिली.
झी मराठी वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत पाठकबाईंना धडा शिकवण्यासाठी सतत डोकं लावत असणारी नंदिता वहिनी म्हणजे अभिनेत्री धनश्री काडगांवकरला या मालिकेमुळे चांगली लोकप्रियता मिळाल्याचे पाहायाला मिळतंय. मालिकेत तिच्या अभिनयासह तिच्या सौदर्यांनेही रसिकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील राणादा आणि पाठकबाईंची जोडी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य तर करतेच आहे पण त्यापाठोपाठ धनश्रीही म्हणजेच नंदिता वहिनीदेखील सा-यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली. रसिकांना नंदिनी वहिनीचा येणारा राग हीच धनश्रीच्या भूमिकेची पोचपावती म्हणावी लागेल. नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी नंदिता आणि पाठकबाई यांच्यामधील निवडणुकीची चुरस पाहिली. मालिकेतील राजकारणी भूमिकेमुळे धनश्रीला थेट निवडणुकीसाठी विचारणा झाली होती.
या बातमीला दुजोरा देत धनश्रीने सांगितलं, "हो, हे खरंय. मालिकेत राजकारणाचा ट्रॅक सुरु झाला, तेव्हा निवडणुकांचं वारं वाहू लागलेलं. मलाही तिकीट मिळवून देतो, राजकारणात उतरा अशी ऑफर आलेली. खरं सांगायचं, तर मी नंदितासारखी नाही. मी काहीशी अबोल-लाजरीबुजरी आहे. मला राजकारणात रस नाही. हो, पण जबाबदार नागरिक असणं मला महत्वाचं वाटतं."
तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अंजली आणि राणा नव्हेच तर बरकत, नंदिता वहिनी, चंदे ही सगळी पात्रं महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहेत. या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजनच नाही केलं तर कुस्ती या खेळाचं महत्त्व देखील दर्शवलं. अंजली आणि राणा यांची हृदयस्पर्शी प्रेमकथा, कठीण परिस्थितीत न डगमगता, एकमेकांच्या साथीने प्रत्येक अडचणीला सामोरं जाण्याची दोघांची वृत्ती प्रेक्षकांना भावली. लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचे आजही तितकेच प्रेम मिळत आहे.