‘स्टार प्लस’वरील ‘दिल है हिंदुस्तानी-2’च्या आगामी भागात बुजुर्ग अभिनेता धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओल हे तिघेही उपस्थित राहणार असून स्पर्धकांच्या गाण्यावर ते तिघेही धमालमस्ती करणार आहेत. या तिघांच्या उपस्थितीमुळे आणि स्पर्धकांच्या गाण्याच्या तालावर हे तिघेही नाचणार असून त्यांना प्रीतम, सुनिधी चौहान आणि बादशहा या परीक्षकांचीही साथ मिळणार आहे. यावेळी देओल पिता-पुत्रांना काही गाणी स्वत: गायल्यावाचून रहावले नाही आणि त्यांनीही आपला सूर स्पर्धकांच्या सुरात मिसळला. यानंतर तिन्ही परीक्षक आणि राघव जुयाल व मुक्ती या सूत्रसंचालकांना प्रसिध्द हिंदी चित्रपटांतील काही गाजलेले संवाद म्हणण्यास सांगण्यात आले आणि त्यावर या तिघांनी एक काल्पनिक नाट्य निर्माण केले. ते पाहताना प्रेक्षकांच्या करमणुकीची परिसीमा झाली. या तिन्ही कलाकारांसमोर आपली कला सादर करण्याची संधी मिळाल्याने सर्व स्पर्धकांमध्येही विशेष उत्साह संचारला होता.
या भागावर टिप्पणी करताना धर्मेंद्र म्हणाले, “सनी आणि बॉबी यांच्यासह मला ‘दिल है हिंदुस्तानी-2’च्या या भागात सहभागी होता आलं, याचा मला विशेष आनंद झाला आहे. या कार्यक्रमात भारतीय संगीताचा सन्मान केला जातो आणि त्यात हिंदुस्तानी संगीतावर प्रेम करणाऱ्या जगभरातील सर्व संगीतप्रेमींना एकत्र येण्याची संधी मिळते. ही एक असामान्य संकल्पना आहे. यातील सर्वच स्पर्धक असामान्य गुणी असून त्यांना गाताना पाहून मला खूपच आनंद झाला. बॉलीवूडबद्दल जगभरात किती प्रेम आहे, ते पाहून मी चकित तर झालोच, पण या परदेशी स्पर्धकांनी बॉलीवूडचं संगीत किती सहजतेनं स्वीकारलं आहे, ते पाहून मी भारावून गेलो.”
‘दिल है हिंदुस्तानी-2’ हा भारतीय संगीताच्या प्रेमामुळे देशांच्या सीमा पुसून टाकणारा आणि हिंदुस्तानी संगीतावर प्रेम करणाऱ्या जगभरातील संगीतप्रेमींना एकत्र आणणारा रिअॅलिटी कार्यक्रम आहे. भारतीय संगीताचा प्रभाव अधोरेखित करणारा आणि जगभरातील स्पर्धकांकडून लोकप्रिय भारतीय संगीताला नवा आयाम देणाऱ्या या कार्यक्रमात जगभरातील हिंदुस्तानींचं एक संमेलनच भरलेलं असतं. या कार्यक्रमात जगभरातील गुणी गायक आणि संगीतकार लोकप्रिय भारतीय गाणी गातील. पण ती गाणी ते स्वत:च्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत गातात.