आपल्या ध्येयाबद्दल प्रेम आणि संपूर्ण समर्पणाची भावना असेल तर ते प्राप्त करण्यात कोणतीही अडचण येत नाही, हे ‘डान्स+4’मधील परीक्षक कॅप्टन धर्मेश येलांडे याच्या जीवनाकडे नजर टाकल्यास दिसून येते. एका गरीब घरातील हा मुलगा याच कार्यक्रमात एक स्पर्धक म्हणून प्रथम आला; आपली चिकाटी, जिद्द आणि कठोर परिश्रमांद्वारे तो नृत्यदिग्दर्शक बनला आणि आता याच कार्यक्रमत तो एक परीक्षक म्हणून काम बघतो आहे.
धर्मेश हा उत्कृष्ट नृत्यकला असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मदत करण्यास सदैव कसा तयार असतो, ते त्याने नुकतेच या कार्यक्रमातून पुन्हा एकदा दाखवून दिले. या कार्यक्रमातील एक स्पर्धक मुलीच्या पालकांकडे आर्थिक अडचणींमुळे घरभाडे भरण्यासाठी पैसे नव्हते. ही गोष्ट समजताच त्याने तात्काळ तिच्यासाठी मदतीचा हात पुढे केला. ऑडिशन्सच्या फेरीपासूनच आँचलच्या नृत्यकौशल्यावर धर्मेश बेहद्द खुश होता. पण तिच्या पालकांकडे घरभाडे भरण्यासाठी पैसे नसतानाही ते आपल्या मुलीचे नृत्यांगना होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करीत आहेत, हे लक्षात येताच धर्मेशने त्यांना तात्काळ तीन वर्षांच्या घरभाड्याचे पैसे आगाऊच दिले. आता निदान कोठे राहायचे, याची त्यांची चिंता तरी मिटली. आसाममधील जोरहाट येथे राहणा-या आँचलच्या मनावरील एक ताण त्याने दूर केला. त्यामुळे ती आता मोकळ्या मनाने आपल्या नृत्याकडे सारे लक्ष देऊ शकेल, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.
धर्मेश म्हणाला, “मी आज जिथे पोहोचलो आहे, तिथे येण्यास मला 18 वर्षं लागली. मलाही ज्या अडचणींशी संघर्ष करावा लागला होता तसा तो कोणालाही करावा लागू नये, अशी माझी इच्छा आहे. जोपर्यंत आँचल मुंबईत आहे, तोपर्यंत मी तिच्या प्रशिक्षणाची सर्वतोपरी काळजी घेईन. तिला बाकी कशाची चिंता करावी लागणार नाही.” धर्मेशच्या या उदार कृतीने सुपरजज्ज रेमो डिसुझा अतिशय प्रभावित झाला आणि तो म्हणाला, “आँचलमधील अप्रतिम नृत्यगुणांकडे बघूनच धर्मेशने हा निर्णय घेतला आहे. तू अशीच कठोर मेहनत घेत राहा म्हणजे सर्वकाही सुरळीत होईल.” ‘डान्स+4’ या कार्यक्रमात केवळ नृत्यकलेलाच प्राधान्य दिले जाते, हेच या घटनेवरून पुन्हा एकदा सिध्द झाले असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.