छोट्या पडद्यावर अलिकडेच 'ढोलकीच्या तालावर' हा डान्स रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या कार्यक्रमात नेहा पाटील ही विजयी ठरली. तर, शुभम बोराडे हा उपविजेता ठरला. विशेष म्हणजे एक मुलगा असूनही त्याची लावणी सादर करण्याची पद्धत प्रेक्षकांना प्रचंड भावली. त्यामुळे आज तो लोकप्रिय लावणी डान्सर म्हणूनही ओळखला जातो. परंतु, त्याच्या लावणी करण्यामुळेच एकेकाळी त्याला अनेकांनी ट्रोल केलं होतं. इतंकच नाही तर त्याने लोकांच्या सततच्या बोलण्याला कंटाळून आत्महत्या करण्याचाही निर्णय घेतला होता.
अलिकडेच शुभमने 'अल्ट्रा मराठी'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या कठीण प्रसंगांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याला कसा संघर्ष करावा लागला. त्यातून तो कसा बाहेर पडला आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला हे त्याने सांगितलं. तुझ्या आयुष्यात कधी कठीण प्रसंग आला होता का? असा प्रश्न शुभमला विचारण्यात आला. त्यावर त्याने त्याची संघर्ष कथा सांगितली.
"बरीच वर्ष झाली या गोष्टीला त्यावेळी मी नवीनच लावणी करायला सुरुवात केली होती. त्यावेळी मुलांनी लावणी करणं लोकांना फारसं पटत नव्हतं. मुलगा लावणी करताना किंवा साडी नेसताना दिसला की लोक त्याच्या तोंडावर हसायचे. आपली आवड म्हणून अनेक जण डान्स करतात. ज्यावेळी एखादी मुलगी डान्स करते त्यावेळी तिला नीट नाचता येत नसेल तरीदेखील लोक तिच्यासाठी टाळ्या वाजवतात. पण, एखाद्या मुलगा ज्यावेळी डान्स करायला शिकतो किंवा लावणी करतो त्यावेळी त्याच्या कपड्यांवरुन, त्याच्या लूकवरुन लोक त्याची खिल्ली उडवतात. त्याला जोकरसारखं वागवतात, माझ्यासोबत बऱ्याचदा असं झालं," असं शुभम म्हणाला.
पुढे तो म्हणतो, माझी आई कुठेही गेली की लोक तिला पाहून कमेंट करायचे, माझ्याबद्दल वाईट बोलायचे. हे सगळं ऐकून माझी आई फार दु:खी व्हायची, रडायची. मी अनेकदा तिला माझ्यासाठी रडताना पाहिलंय. मला फार त्रास व्हायचा यामुळे. लोकांमुळे माझ्या आईला त्रास होतोय हा विचार सतत डोक्यात येत असल्यामुळे मी गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी माझ वय कमी होतं तरी मी हे पाऊल उचललं होतं. मी सहावीत असताना गळफास घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माझा एक मित्र मला घरी बोलवायला आला होता. त्याने मला पेरुच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत पाहिलं आणि वर उचलून धरलं. त्याच्यामुळे मी वाचलो. पण, तेव्हा घरी खूप रडारड झाली होती.
दरम्यान, लोकांच्या बोलण्यामुळे माझ्या मनात हा विचार आला होता. विचार करा लोकांचं बोलणं एखाद्याच्या किती जिव्हारी लागू शकतं. त्यामुळे बोलण्यापूर्वी कायम विचार करा. बोलणं खूप सोपं आहे. पण, समोरच्यासाठी ते ऐकणं फार कठीण आहे. एखादी व्यक्ती त्यामुळे डिप्रेशनमध्ये जाऊ शकते.