'लक्ष्मीच्या पावलांनी' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू असलेल्या या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. या मालिकेतील कलाकारांवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. अभिनेता अक्षर कोठारे आणि अभिनेत्री ईशा केसकर यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत. मालिका रंजक वळणावर असताना अचानक 'लक्ष्मीच्या पावलांनी'मधील एका कलाकाराने एक्झिट घेतली आहे.
या मालिकेत रोहिणी आणि तिचा मुलगा राहुल खलनायकाची भूमिका साकारत आहेत. आता राहुल ही भूमिका साकारणारा अभिनेता ध्रुव दातार याने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. ध्रुवने 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिका सोडली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत त्याने चाहत्यांना माहिती दिली आहे. मालिकेच्या सेटवरील कलाकारांचे काही फोटो ध्रुवने शेअर केले आहेत.हे फोटो शेअर करत त्याने मालिकेतील कलाकारांचे आभार मानले आहेत.
ध्रुवने 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर आता त्याच्या जागी नव्या अभिनेत्याची मालिकेत एन्ट्री होणार आहे. 'आई कुठे काय करते' फेम अभिनेता अद्वैत कडणे हा कलाकार आता 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेत राहुलची भूमिका साकारताना दिसणार आहे. अद्वैतने 'आई कुठे काय करते'मध्ये ईशाचा बॉयफ्रेंड साहिलची भूमिका साकारली होती. त्याने 'जाऊ नको दूर बाबा', 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकांमध्येही काम केलं आहे.