Join us

डीआयडी लिटिल मास्टर्स या कार्यक्रमात हे कलाकार दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 5:34 AM

देशातील सामान्य माणसातील विविध गुणांच्या प्रदर्शनासाठी ‘झी टीव्ही’ने गेल्या २५ वर्षांत एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ‘डान्स इंडिया ...

देशातील सामान्य माणसातील विविध गुणांच्या प्रदर्शनासाठी ‘झी टीव्ही’ने गेल्या २५ वर्षांत एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. ‘डान्स इंडिया डान्स’ या कार्यक्रमाने भारतातील नृत्यक्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमाने फैझल खान, हरप्रीत, जीतूमोनी आणि तेरिया मगर यांच्यासारखे उत्कृष्ट नर्तक आजवर दिले आहेत. आता ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ लहान मुलांमधील नृत्यांच्या कौशल्याला वाव देणार आहे. येत्या वीकेण्डच्या कार्यक्रमात ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ आपल्या नव्या आवृत्तीतील अंतिम १६ स्पर्धकांची नावे घोषित करणार आहे. नृत्याचा सर्वोच्च महोत्सव असलेला ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ कार्यक्रम दर शनिवार-रविवारी रात्री ९ वाजता ‘झी टीव्ही’वरून प्रसारित होईल. या शो ची निर्मिती एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन्स लिमिटेडची आहे. ‘डान्स इंडिया डान्स’ या कार्यक्रमात ब्लॉकबस्टर बच्चेकंपनीसोबतच परीक्षक, सूत्रसंचालक यांची धमाल मस्ती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बॉलिवूडमधील दोन नामवंत सेलिब्रिटी या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावरील रिअ‍ॅलिटी कार्यक्रमांमध्ये पदार्पण करत आहेत. लोकप्रिय नृत्ये सादर करून प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेल्या आणि आपले सौंदर्य, परिपक्व अभिनयगुण, नृत्यकलेने आपले स्थान निर्माण केलेली बॉलिवूडची रूपसुंदर तारका चित्रांगदा सिंह आणि बहुआयामी दिग्दर्शक आणि उत्कृष्ट कथाकथनकार म्हणून गणला जाणारा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद हे या कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम बघणार आहेत. ते या कार्यक्रमाद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहेत. या कार्यक्रमाच्या पूर्वीच्या आवृत्त्यांमध्ये परीक्षक म्हणून काम बघितलेला मार्झी पेस्तनजी हा या आवृत्तीतही परीक्षकाच्या खुर्चीत बसणार आहे. नृत्य आणि नाट्य यांच्यात समतोल साधण्यास हे परीक्षक स्पर्धकांना मार्गदर्शन आणि मदत करतील. याशिवाय या स्पर्धकांना मार्गदर्शक करण्यास वैष्णवी पाटील, तनय मल्हारा, जीतुमोनी कालिया आणि बीर राधा शेर्पा हे कार्यक्रमाचे स्किपर्स असतील. हे स्किपर्सही पूर्वी याच कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला विनोदाची फोडणी देण्यासाठी आणि प्रेक्षकांना विरंगुळा देण्यासाठी जय भानुशाली हा कार्यक्रमाचा सूत्रधार आपल्या नर्म विनोदी आणि मिश्किल टिप्पण्यांनी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य निर्माण करील. त्याला तितकीच विनोदी साथ देण्यासाठी तमन्ना ही बाल विनोदवीरही या कार्यक्रमात सहभागी होईल. तमन्नाने ‘झी टीव्ही’वरील ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ’चा किताब मिळवला आहे. Also Read : ‘बाबूमोशाय बंदूकबाज’​ची अभिनेत्री बिदिता बाग हिने चित्रांगदा सिंहबद्दल दिले असे काही बयान!