बी. आर. चोप्रा यांच्या महाभारतने प्रेक्षकांचे प्रचंड मन जिंकले होते. ही मालिका आज इतक्या वर्षांनी देखील प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. ही मालिका सुरू असताना त्या काळात लोक घराच्या बाहेर देखील पडायचे नाहीत. सध्या देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन असल्याने दूरदर्शनवर महाभारत ही प्रेक्षकांची आवडती मालिका पुन्हा एकदा दाखवली जात आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. या मालिकेला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले असल्याने या मालिकेतील कलाकारांनी या मालिकेतून बक्कळ पैसे कमावले असतील असे तुम्हाला वाटत असेल ना... पण हे खरे नाहीये. या मालिकेतील कलाकारांना या मालिकेत काम करण्यासाठी खूपच कमी मानधन मिळत असे...
टेलिचक्कर या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, या मालिकेत काम करणाऱ्या सगळ्या कलाकारांना समान मानधन दिले जात असे. या मालिकेतील प्रत्येक भागासाठी त्यांना तीन हजार इतके मानधन मिळत असे. तीन हजार रुपयांचे मूल्य हे त्या काळासाठी जास्त होते. पण चित्रपट, मालिकांचा विचार केला तर कलाकारांना त्यापेक्षा अधिक मानधन अभिनय करण्यासाठी मिळत असे. या मालिकेचे ९४ एपिसोड झाले होते. त्यामुळे अनेक भागांमध्ये झळकणाऱ्या कलाकारांची या मालिकेमुळे लाख-दोन लाख रुपयांची कमाई झाली होती.
महाभारत या मालिकेचा या मालिकेतील सगळ्याच कलाकारांना प्रचंड फायदा झाला. या मालिकेमुळे त्यांना विविध मालिकांच्या ऑफर मिळाल्या. तसेच अनेक कलाकारांना चित्रपटांमध्ये भूमिका साकारण्याची संधी मिळाली. तसेच अनेक कलाकार राजकारणाकडे वळले. त्यामुळे कलाकारांना त्या काळात कमी मानधन मिळाले असले तरी त्यांना त्यांच्या या मालिकेतील भूमिकेचा भविष्यात उपयोग झाला.