Join us

बिग बॉस मराठी 2 फेम अभिजीत बिचुकले सातारा नगरपालिकेत करायचा ही नोकरी, वाचा त्याचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 2:51 PM

अभिजीत बिचुकले बिग बॉस मराठीच्या घरात असताना त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. प्रेक्षकांचा तो अतिशय लाडका बनला होता.

ठळक मुद्देअभिजीत बिचुकले साताऱ्यातील गुरूवार पेठ परिसरात एका छोट्याशा पत्र्याच्या खोलीत राहातो. तो पूर्वी सातारा नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत होता.

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असलेला स्पर्धक अभिजीत बिचुकलेचा जामीन अर्ज नुकताच फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा बिग बॉसमध्ये परत येण्याचा मार्ग बंद झाला आहे. अभिजीत बिचुकले मुंबईत बिग बॉस कार्यक्रम संपल्यावर फरार होऊ शकतो, असे कारण देत सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने अभिजीत बिचुकलेचा जामीन अर्ज फेटाळला आहे. जामीन मिळावा यासाठी अभिजीतचे वकील आता हायकोर्टात देखील अर्ज करणार आहेत. पण सध्याची परिस्थिती पाहाता अभिजीत बिचुकलेचा बिग बॉस मराठीच्या घरात परतण्याचा मार्ग खडतर झाला आहे असे म्हणावे लागेल.

अभिजीत बिचुकले बिग बॉस मराठीच्या घरात असताना त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. प्रेक्षकांचा तो अतिशय लाडका बनला होता. त्याच्या कवितांची तर या घरात चांगलीच चर्चा रंगली होती. अभिजीतला या कार्यक्रमामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली असून त्याचा भूतकाळ काय आहे, तो कोण आहे हे जाणून घ्यायची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता असते. त्याच्या फॅन्सना आम्ही त्याच्याविषयी आज काही खास गोष्टी सांगणार आहोत. 

अभिजीत बिचुकले राजकारणात अनेक वर्षांपासून कार्यरत असून 2004 पासून तो निवडणूक लढवत आहे. त्याने आतापर्यंत नगरपालिकेपासून ते खासदार पदापर्यंतच्या निवडणुका लढवल्या आहेत. पण बिचुकलेला कोणतीच निवडणूक अद्याप जिंकता आलेली नाही. 2019 निवडणुकीच्यावेळी बिचुकलेने त्याच्या प्रचारासाठी लावलेल्या एका बॅनरची तर प्रचंड चर्चा झाली होती. कारण 2019 चा मुख्यमंत्री मीच असणार असे त्याने त्या बॅनरवर लिहिले होते. या बॅनरवर लोकांनी त्याची चांगलीच खिल्ली उडवली होती. 

बिग बॉस मराठी 2 च्या घरात असताना माझ्याकडे इतका पैसा आहे, माझा मुलगाच 25 हजार रुपयांच्या गाड्यांनी खेळतो असा म्हणणारा अभिजीत बिचुकले साताऱ्यातील गुरूवार पेठ परिसरात एका छोट्याशा पत्र्याच्या खोलीत राहातो. तो पूर्वी सातारा नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत होता. पण राजकारणात रस असल्याने त्याने ही नोकरी सोडली.  

टॅग्स :बिग बॉस मराठीअभिजीत बिचुकले