झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मालिकेतील स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकरची केमिस्ट्री प्रेक्षकांंना भावते आहे. स्वप्निल मालिकेत सौरभची भूमिका साकारतो आहे तर शिल्पा अनामिकाचं पात्र साकारतेय. मालिकेत आता सौरभच्या मावशीची एंट्री झाली आहे. सौरभचे अनामिकासोबत लग्न व्हावे म्हणून माई मावशी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हे पात्र प्रेक्षकांना विशेष भावलेले पाहायला मिळत आहे.
सौरभच्या मावशीची भूमिका अभिनेत्री उज्वला जोग साकारत आहेत. उज्वला जोग या मराठी सृष्टीतील सोज्वळ अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. नुकतेच पावनखिंड या चित्रपटात त्यांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्या मातोश्री बयोबाई देशपांडे ही दमदार व्यक्तिरेखा साकारली होती. चित्रपट, मालिका आणि रंगभूमीवरील उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून त्या ओळखल्या जातात. पण तुम्हाला माहिती आहे का उज्वला जोग यांचं पती आणि मुलगी दोनही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चेहरे आहेत.
उज्वला जोग या प्रसिद्ध अनिभेते अनंत जोग यांची पत्नी आहेत. अनंत जोग यांनी मराठीच नाही तर हिंदी सिनेमातही आपल्या भूमिकांनी छाप पाडली आहे.'रावडी राठोड','नो एन्ट्री', 'शांघाय', 'दहेक', 'कच्ची सडक','सरकार', 'लाल सलाम', 'रिस्क', 'सिंघम' यांसारख्या सुपहिट सिनेमातल्या त्यांच्या भूमिकाही गाजल्या आहेत. त्यांनी अनेक हिंदी सिनेमात खलनायकाच्या भूमिका साकारत रसिकांचे मनोरंजन केले आहे. सिनेमाच नाही तर मालिकेतही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. रुपेरी पडद्यावर खलनायकी भूमिकेने आपले अस्तित्व निर्माण करणारे अनंत जोग यांनी मराठी मालिकेत मात्र हळव्या भूमिका साकारल्या आहेत.
अनंत जोग आणि उज्वला जोग यांच्या प्रमाणे त्यांच्या मुलीनेही इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री म्हणून आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. क्षिती जोग असे तिचे नाव. आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत क्षितीनेही अभिनय क्षेत्रात एंट्री करत स्वतःला सिद्ध केले.
क्षिती जोग 'दामिनी' या गाजलेल्या मालिकेतून प्रकाशझोतात आली होती. 'तू तिथे मी','गंध फुलांचा गेला सांगून' मराठी मालिकेसोबतच हिंदी मालिकेतही तिच्या भूमिकांनी तिने रसिकांचे भरघोस मनोरंजन केले आहे. 'घर की लक्ष्मी बेटिया','साराभाई vs साराभाई', 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतही क्षिती झळकली होती.