बिग बॉस मराठी २ ची सध्या चांगलीच चर्चा असून या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता लोकांना लागली आहे. बिग बॉस मराठीतील आपला आवडता सदस्य या कार्यक्रमाचा विजेता ठरावा असे प्रेक्षकांना वाटत आहे. या बिग बॉस २ च्या घरात सध्या अभिजीत केळकर हा स्पर्धक आपल्याला पाहायला मिळत असून त्याला या कार्यक्रमामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. अभिजीत केळकरने तुझे माझे जमेना, मधु इथे आणि चंद्र तिथे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तर काकस्पर्श, बालगंधर्व या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याला या चित्रपट, मालिकांपेक्षा बिग बॉसमुळे जास्त प्रसिद्धी मिळाली असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.
अभिजीतच्या खाजगी आयुष्याविषयी काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अभिजीतचे लग्न झालेले असून त्याला दोन जुळी मुले आहेत. त्याच्या पत्नीचे नाव तृप्ती असून राधा आणि मल्हार अशा त्याच्या दोन गोंडस मुलांची नावे आहेत.
त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला त्याच्या मुलांचे आणि पत्नीचे फोटो पाहायला मिळत आहेत.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना बिग बॉसकडून मागील आठवड्यामध्ये कठोर शिक्षा मिळाली. घरातील सदस्य बिग बॉसच्या वारंवार सूचनानंतर देखील नियमांचे उल्लंघन करताना दिसत होते. घरामध्ये झोपणे, कुजबुज करणे, नॉमिनेशनचे प्लानिंग करणे, माईक न घालणे इत्यादी आणि आता तर घरातील कॅप्टन अभिजीत केळकरने बिग बॉसच्या महत्वाच्या नियमाचे उल्लंघन केले. त्यामुळे आता अभिजीतने स्वत:लाच शिक्षा दिली आहे.
अभिजीतचे म्हणणे होते, घराचा कॅप्टन असून देखील माझ्याकडून चूक घडली. मी माईक चुकीच्या पद्धतीने घातला होता आणि यासाठी मी शिक्षा भोगली पाहिजे असे माझ्या मनामध्ये होते आणि म्हणूनच मी स्वत:ला अडगळीच्या खोलीमध्ये डांबून घेतले आणि एकदंरीतच आमच्या कडून ज्या चुका झाल्या, काही नियमांचे उल्लंघन झाले त्यामुळे तुम्ही शिधा बंद केली. ती पूर्ववत व्हावी अशी त्याने आता बिग बॉसना विनंती केली आहे.