मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे किरण माने (kiran mane). बिग बॉस मराठीच्या माध्यमातून किरण माने घराघरात पोहोचले. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो. किरण मानेदेखील या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात. त्यामुळे समाजात घडणाऱ्या वा त्यांच्या वैयक्तिक जीवनात घडणाऱ्या अनेक गोष्टींवर ते उघडपणे भाष्य करत असतात. यात अलिकडेच त्यांनी त्यांच्या पत्नीसाठी एक पोस्ट लिहिली आहे.
काय आहे किरण माने यांची पोस्ट?
"...एक नाही, दोन नाही, तब्बल ऐंशी दिवस मी तिला पाहिलं नव्हतं, बोललो नव्हतो ! लग्नानंतरच्या तेवीस वर्षांत पहिल्यांदाच असं झालंवतं. फॅमिली विकच्या दिवशी 'बिगबॉस'च्या घरात तिनं पाऊल ठेवलं... तिला पाहिलं आणि मी लहान मुलासारखं रडायला सुरूवात केली. तो क्षण आता पहाताना हसू येतं, लैच विनोदी दिसलोय मी... पण त्यावेळी मनाची काय अवस्था झालीवती हे शब्दांत नाही सांगू शकत ! बिग बॉसमध्ये गेल्यावर मला कळलं की, माझ्या आयुष्यात मी किती अवलंबून आहे तिच्यावर. मी स्वत:ला अभिनयक्षेत्रात संपूर्णपणे, तन-मन-धनानं झोकून दिलं... तेव्हापास्नं...घरात लाईटबिल किती येतं, पाणीबिल कोण भरतं, डाळीचा भाव काय आहे, भाजीपाला कधी आणतात, गॅस संपल्यावर कुणाला फोन करायचा असतो, मुलांच्या शाळेतल्या 'पॅरेन्ट मिटींग्ज' कधी असतात, आईदादांच्या मेडिकल चेकअपच्या तारखा काय आहेत, वरच्या मजल्यावरचे दोन फ्लॅट भाड्याने दिलेले आहेत त्याचं महिन्याला किती भाडं येतं...वगैरे वगैरे वगैरेपास्नं ते बेसन लाडू कुठल्या डब्यात आहेत, उकडलेल्या शेंगा कुठं ठेवल्यात...या गोष्टींतलंही मला अजूनही काहीही माहिती नाही ! घर सांभाळणं खायचं काम नाय राव. साधी बिगबॉसच्या घरातली कामं वाटून घेऊन ती करता-करता आमची वाट लागत होती. हे 'गृहिणी'पद म्हणजे एखाद्या बड्या कंपनीच्या सीईओ पेक्षा किंचीत जास्तच मल्टीटास्किंग आहे !!!", असं किरण माने म्हणाले.
पुढे ते म्हणतात," तुम्ही म्हणाल, काय हा माणूसय. मी घरातलं काय बघत नाय, ही काय कौतुकानं सांगायची गोष्टय का? काहीजणांना वाटेल किती हाल होत असतील तिचे? पण नाही मित्रांनो. तिनं माझी पॅशन ही तिची पॅशन बनवली आणि नोकरी सोडून स्वखुशीनं हा निर्णय घेतला. मला एका फार मोठ्या जबाबदारीतून 'रिलॅक्स' ठेवलं आणि म्हणाली "लढ तू. तुझ्या पॅशनला फॉलो कर. ज्यात तुझा आनंद आहे, ते करत तू मोठा झालेला पहायचंय मला. घराची काळजी करू नकोस. मी इथे काही कमी पडू देत नाही तू अभिनयात कुठे कमी पडू नकोस." आज आपल्या सहजीवनाला चोवीस वर्ष पूर्ण झाली. रौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण करतोय आपण. मी शुटिंगमधून सुट्टी घेणार होतो. तू नको म्हणालीस. "या दिवशी तुम्ही शुटिंग करत असणं, कॅमेर्यासमोर असणं हे 'आपलं' सेलिब्रेशन !" आज आपल्या दोघांच्या आवडत्या कोल्हापूरात शुटिंग करतोय. माझी अंबाबाई जसा विश्वाचा पसारा सांभाळते, तशी तू माझ्या जगावर सावली धरलीयेस... लै लै लै प्रेम, बायको ! Happy Anniversary