सोनी मराठी वाहिनी नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली असून या वाहिनीवर वेगवेगळ्या जॉनरच्या मालिका पाहायला मिळत आहेत. त्यात आता या वाहिनीवर एक वेगळी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. 'इयर डाऊन' असे या मालिकेचे नाव आहे. 'इयर डाऊन' या मालिकेचा अनावरण सोहळा नुकताच अंधेरीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. यावेळी मालिकेतील कलाकार व तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होते.
जाहिरातींमधील 'अटी आणि शर्ती लागू' हे छोट्या आकारातले शब्द आपल्याला विचार करायला लावतात आणि एखादी शंकाही येते. हेच वाक्य जर एखाद्याच्या आयुष्याचाच भाग होत असेल तर जनमेजय हा संपन्न कुटुंबातला. पण वडिलांच्या मनाविरुद्ध म्हणजेच अटी आणि शर्ती विरुद्ध त्याने वायनरी टाकलीय. त्यामुळे तेढ आहे. आईने त्याला सगळ्या बाबतीत पाठीशी घातले आहे आज उद्योजक असला तरीही. इथे एक युवती जनमेजयच्या जीवनात येते. दोघेही प्रेमात पडतात. इथपर्यंत सगळे ठीक होते. लग्नालाही मुलीकडून होकार आहे पण, आड येतात अटी आणि शर्ती... मुलीच्या वडीलांची अट अशी की जनमेजयने अभियांत्रिकीची पदवी मिळवायला हवीच. सुरुवात महाविद्यालयातल्या प्रवेशापासून असली तरी पुढे आणखी किती अटी आणि शर्ती लागू होणार कुणास ठाऊक! यासाठी ही मालिका पाहावी लागेल.जनमेजयच्या भूमिकेत अभिनेता संतोष जुवेकर दिसणार आहे आणि त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री प्रणाली घोगरे दिसणार आहे. या मालिकेचे दिग्दर्शन समीर पाटील करत आहेत. या मालिकेतून पहिल्यांदाच संतोष जुवेकर व प्रणाली घोगरे एकत्र काम करत आहेत. त्यामुळे या दोघांची केमिस्ट्री ऑन स्क्रीन कशी वाटते, हे पाहणे औत्सुकतेचे ठरेल.