Join us

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेआधी सखी गोखलेने या चित्रपटात केले होते काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 4:32 PM

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेच्या आधी सखीने एका चित्रपटात काम केले होते हे तुम्हाला माहीत आहे का.... हो हे खरे आहे, सखी एका हिंदी चित्रपटात झळकली होती. 

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे सखी गोखले हे नाव घराघरात पोहोचले. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. यानंतर ती दिल दोस्ती दोबारा या मालिकेत देखील मुख्य भूमिकेत झळकली. तसेच अमर फोटो स्टुडिओ या नाटकात देखील तिने काम केले आहे. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेच्या आधी सखीने एका चित्रपटात काम केले होते हे तुम्हाला माहीत आहे का.... हो हे खरे आहे, सखी एका हिंदी चित्रपटात झळकली होती. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला रंगरेज हा चित्रपट तुम्हाला आठवतोय का? या चित्रपटात वेणू नावाची एक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. या वेणूची भूमिका सखीने साकारली होती. पण त्यावेळी सखीच्या नावाची तितकीशी चर्चा झाली नव्हती. पण दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे सखीला चांगलीच लोकप्रियता मिळाली. सखी ही प्रसिद्ध अभिनेता मोहन गोखले आणि शुभांगी गोखले यांची मुलगी आहे. तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी फोटोग्राफीमध्ये डिग्री प्राप्त केली आहे. पुण्याच्या भारतीय विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफीमधून फॅशन आणि फाईन आर्ट्स फोटोग्राफीचे प्रशिक्षण घेतले आहे.  सखीचे वडील मोहन गोखले हे एक प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांचे वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. कमल हासनच्या हे राम या चित्रपटाचे चेन्नईत चित्रीकरण सुरू होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मोहन गोखले तिथे गेले होते. पण २९ एप्रिल १९९९ला त्यांचे तिथेच निधन झाले. त्यावेळी सखी केवळ सहा वर्षांची होती. सखीची आई शुभांगी गोखले यांनी सखीला आई-वडील दोघांचेही प्रेम दिले. शुभांगी गोखले या आज छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी आत्मकथा या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीवरील त्यांच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यांनी आजवर लापतागंज, श्रीयुत गंगाधर टिपरे, काहे दिया परदेस यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.  

टॅग्स :सखी गोखले