गावाच्या पारापासून ते मेट्रो सिटीच्या कॅफेपर्यंत कुठेही कट्टा टाकणाऱ्या कोणत्याही तरुण तरुणींच्या अन्न, वस्त्र आणि निवाऱ्या सारख्याच आणखी तीन मुलभूत गरजा म्हणजे, रिलेशनशिप स्टेट्स, करियरचा सक्सेस आणि वाय फायचा स्पीड. यात रिलेशनशिप स्टेट्स सिंगल आहे की कमिटेड याचा परिणाम करियरवर व्हायला वेळ लागत नाही आणि वाय फाय स्पीडवरच तर तुम्ही सिंगलचे कमिटेड होणार की नाही, हे ठरत असतं. आजच्या तरुणाईला आपलेच वाटतील असे सचिन, सायली आणि सुरेखा या एकमेकांचे घट्ट दोस्त असणारे आणि त्याच बरोबर एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे हे तिघेजण तुम्हाला भेटतील ‘सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड’ या स्टोरीटेल मराठीच्या नव्या कोऱ्या करकरीत ऑडीओ सिरीजमध्ये. या ऑडीओ सिरीजला आवाज दिला आहे गुणी अभिनेत्री पूजा ठोंबरे आणि उत्तम लेखक आणि अभिनेता असणाऱ्या साईनाथ गणुवाड याने.
माधवी वागेश्वरीने ही ऑडीओ सिरीज खास स्टोरीटेल मराठीसाठी लिहिली आहे. या आधी देखील ‘करसाळ’ ही स्टोरीटेल मराठीसाठी पहिली मल्टी व्होईस सिरीज तिने लिहिली होती, ज्याकडे वेगळा प्रयोग म्हणून पाहिलं गेलेलं आहे.
‘सिंगल, कमिटेड, कॉम्प्लिकेटेड’ या सिरीजसाठी पूजा आणि साईनाथ यांनी विशेष मेहनत घेतली आहे. ही गोष्ट मराठवाडा आणि पुणे अशा दोन ठिकाणी घडते, त्यामुळे त्या त्या व्यक्तिरेखांचे आवाज, भाषेचे बारकावे समजून उमजून घेऊन त्याच बरोबर गोष्ट वाचनातून वेगवान ठेवण्याचे काम त्यांनी एकमेकांच्या मदतीनं पेलेलं आहे.