कीर्तन हे लोकजागृती, समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. ‘नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।।’ असं म्हणत आजवर असंख्य कीर्तनकारांनी कथा, विनोद, दैनंदिन घडामोडी यांच्या आधाराने कीर्तन करत जनजागृती केली आहे. शेमारू मराठीबाणा वाहिनीवरील 'गजर माऊलीचा उत्सव कीर्तनाचा’ या ‘आषाढवारी विशेष’ कीर्तन मालिकेतंर्गत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन रंगणार आहे.
ह.भ.प. उत्तम महाराज बडे, ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे, ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे, ह.भ.प. सौ. संगीताताई येनपुरे चोपडे, ह.भ.प. नेहाताई भोसले साळेकर, ह.भ.प. महादेव महाराज बोराडे शास्त्रीजी हे नामवंत कीर्तनकार रविवार ४ जुलैपासून दररोज सायंकाळी ६ वाजता आपले कीर्तन सादर करतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता पुष्कराज चिरपुटकर करणार आहे.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक अधिष्ठान असलेल्या वारीची परंपरा जपण्यासाठी तसेच भक्तीचे अतूट बंध निर्माण करणाऱ्या पंढरपूरच्या आनंदवारी सोहळ्याची अनुभूती भक्तांना मिळावी यासाठी ‘वारी तुमच्या दारी’ हा अनोखा उपक्रम शेमारू मराठीबाणा वाहिनीने योजिला आहे. एका चित्ररथाला पंढरपूरच्या मंदिराचे स्वरूप देत हा चित्ररथ वेगवेगळ्या शहरांत जाऊन तिथल्या भक्तांसाठी भक्तीद्वार खुले करणार आहे. ५ जुलैपासून पुणे, औरंगाबाद, अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यांमधल्या ११ शहरांतून हा चित्ररथ फिरणार आहे. वारकऱ्यांच्या साथीने भजन, कीर्तन, नामगजर, हरिपाठ, भारूड या सगळ्या अध्यात्माच्या भक्तिखेळाचे दर्शन घडविले जाणार आहे. ९ दिवस प्रत्येक शहरांत वारीचा भक्ती सोहळाच रंगणार आहे. फलटणपासून सुरु झालेल्या या सोहळ्याची सांगता पंढरपूरात होणार आहे. यात सहभागी विठ्ठलभक्तांसाठी खास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी वारकऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे.
‘लेकराला जशी एकच आई, तशी वारकऱ्याला एकच माऊली... तो म्हणजे विठ्ठल’. विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या अनेकांना भक्तीगीते स्फुरली आहेत. विठ्ठल आणि भक्तांच्या अभंग आणि चिरंतन नात्याला अधोरेखित करण्यासाठी अनोख्या भक्तीगीत रचनेची संधी देखील भक्तांना देण्यात येणार आहे. वाहिनी व वाहिनीच्या सोशल माध्यमातून हा आगळावेगळा उपक्रम राबविला जाणार आहे. भक्तीगीताच्या पहिल्या दोन ओळी शेमारू मराठीबाणा या वाहिनीतर्फे दिल्या जातील. त्याला अनुसरून गीताच्या पुढच्या दोन ओळी तयार करायच्या असून उत्कृष्ट ओळींची निवड करून शेमारू मराठीबाणा वाहिनीतर्फे भक्तीगीताची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी अधिकाधिक सहभाग नोंदवण्याचे आवाहन वाहिनीने केले आहे.