‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेली 13 वर्षे प्रेक्षकांचं निरंतर मनोरंजन करतेय. गेल्या 13 वर्षांत अनेक मालिका आल्या, गेल्या. पण ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेइतकी लोकप्रियता कोणालाच मिळाली नाही. मालिकेतील सर्व पात्र आणि ही पात्र साकारणारे कलाकार जणू आपल्या घरातील सदस्य झाले आहेत. जेठालाल असो की टप्पू किंवा मग भिडे मास्तर या पात्रांवर लोकांनी भरभरून प्रेम केलं. आता तर जेठालाल, टप्पू यांच्याशिवाय या मालिकेची कल्पनाही करता येणार नाही. मात्र तूर्तास मालिकेच्या पडद्याआड अनेक घडामोडी सुरू आहेत. मध्यंतरी टप्पूची भूमिका साकारणारा राज अनादकत शो सोडणार अशी बातमी आली आहे. आता जेठालाल (Jethalal) अर्थात दिलीप जोशी (Dilip Joshi) हे सुद्धा मालिका सोडणार, अशी चर्चा आहे. साहजिकच या बातम्यांनी चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
दयाबेन अर्थातच दिशा वकानी मालिकेतून गायब झाली आहे. गर्भवती असल्याने तिनं मालिकेतून बे्रक घेतला आणि तेव्हापासून आजपर्यंत ती मालिकेत परतलीच नाही. अशात आता जेठालालसुद्धा मालिकेला रामराम करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्याने प्रेक्षक निराश आहेत. अर्थात या चर्चांवर आता खुद्द दिलीप जोशी यांनी खुलासा केला आहे.
‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या एका मुलाखतीत ते या चर्चेवर बोलले. ‘मालिका उत्तम सुरू आहे आणि यात काम करणे मजेदार अनुभव आहे. मी या मालिकेत काम करताना एन्जॉय करतो. असं सगळं असताना मी मालिका का सोडू?’असा उलट प्रश्न त्यांनी केला. ज्या दिवशी मालिकेत काम करण्याचा आनंद संपला, असं मला वाटेल तेव्हा मी निश्चितपणे मालिकेला अलविदा म्हणेल. पण तूर्तास तरी माझा असा काहीही वचार नाही. मला अनेक शोच्या ऑफर येतात. पण ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने मला, माझ्या कुटुंबाला खूप काही दिलं. मी समर्पित भावनेनं मालिका करतोय. हा एक सुंदर प्रवास आहे आणि मी आनंदी आहे. त्यामुळे विनाकारण मी या आनंदावर विरजण का घालू?, असं ते म्हणाले.
मी अनेक चित्रपटांत काम केलं आहे. यापुढेही चित्रपटात मनासारखा रोल मिळाला तर तो मी करेल,असंही त्यांनी स्पष्ट केलं.तुम्हाला कदाचित माहित नसेल पण एकेकाळी दिलीप जोशी बॅकस्टेजला काम करत. एका मुलाखतीत त्यांनी स्वत:च हा खुलासा केला होता. ‘एकेकाळी मला कोणीही काम देत नव्हतं. मी बॅकस्टेजला काम करायचो. मला प्रत्येकवेळी 50 रुपये मिळत. परंतु एकेदिवशी चांगली भूमिका मिळेल या आशेवर मी काम करत होतो. अशात मला तारक मेहता का उल्टा चष्मा मालिका मिळाली आणि या मालिकेनं माझ्या आयुष्याचं सोनं केलं,’ असं ते म्हणाले होते.