लोकप्रिय टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'तून घराघरात पोहोचलेले अभिनेते दिलीप जोशी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध चेहरा आहेत. जेठालालसाठी तारक मेहता पाहणारे त्यांचे कितीतरी चाहते आहेत. टीव्ही शो आधी दिलीप जोशी (Dilip Joshi) यांनी हिंदी, गुजराती सिनेमांमध्येही काम केलं. एका मुलाखतीत त्यांनी दीड महिन्यात १६ किलो वजन कमी केल्याचा किस्सा सांगितला.
दीड महिन्यात घटवलं १६ किलो वजन
जेठालाल म्हणजेच अभिनेते दिलीप जोशी यांनी नुकतीच एका वेबपोर्टलला मुलाखत दिली. ते म्हणाले,"हुन हुनशी हुनशीलाल या सिनेमात मी काम करत होतो. पॉलिटिकल सटायर म्युझिकल फिल्म होती. मला या सिनेमासाठी वजन कमी करण्यास सांगितलं होतं. मी मरिन ड्राईव्हच्या एका स्विमिंग क्लबचा लाईफटाईम मेंबर आहे. कामावरुन परत येताना मी इथे स्कुटर पार्क करायचो, कपडे बदलायचो आणि 45 मिनिटाचत मरिन ड्राईव्हला चक्कर मारायचो. म्हणूनच मी दीड महिन्यात 16 किलो वजन कमी करु शकलो. सूर्य मावळत असताना, छान वारं सुटलं असताना मला पळायला खूप आवडायचं."
सोशल मीडियावर का नाही?
सोशल मीडियाबाबतीत दिलीप जोशी म्हणाले, "ती फार वेळ खाणारी गोष्ट आहे. सोशल मीडिया एक चांगलं व्यासपीठ आहे पण त्यासाठी मला वेळ मिळत नाही. लोक त्याचा गैरवापरही करतात. अनेकदा तर मी शो सोडत असल्याची अफवाही पसरवण्यात आली आहे. अशा बातम्या मला निराश करतात."
चंपकलाल किंवा जेठालाल दोन्हीपैकी एक भूमिका
दिलीप जोशी म्हणाले, "जेव्हा मला शो ऑफर झाला तेव्हा चंपकलाल किंवा जेठालाल दोन्हीपैकी एक भूमिका निवडायला सांगण्यात आलं होतं. मी स्क्रीप्ट वाचली तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी चंपकलालच्या भूमिकेत फिट बसणार नाही. म्हणून मी जेठालालची भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला. या भूमिकेसाठी मला निवडलं त्याबाबत मी निर्माता असित मोदींचा कायम आभारी राहीन."