Join us  

Divyanka Tripathi : इटलीत पासपोर्ट अन् पैसे चोरीला, थेट पतंप्रधान जॉर्जिया मेलोनींसाठी पोस्ट करत दिव्यांका त्रिपाठी म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 6:10 PM

दिव्यांकाने थेट इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याकडे मदत मागितली आहे. 

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया हे हिंदी मालिका विश्वातील लोकप्रिय कपल आहे. नुकतंच दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक दहिया हे दोघे लग्नाच्या वाढदिवसानिमित्त इटलीला  फिरण्यासाठी गेले होते. पण, तिथे त्यांच्यासोबत एक भयंकर प्रकार घडला आहे. ईटलीमधील फ्लोरेंसमध्ये या भागात फिरत असताना विवेक आणि दिव्यांकाचा पासपोर्ट, पर्स आणि १० लाख रुपये किमतीच्या इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या. या घटनेनंतर विवेक व दिव्यांका यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला पण त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. यावर आता दिव्यांकाने थेट  इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याकडे मदत मागितली आहे. 

दिव्यांकाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर जॉर्जिया मेलोनी यांना टॅग करत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिनं जॉर्जिया मेलोनी यांच्याकडे मदत मागितली आहे. तिनं लिहलं, 'प्रिय पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी.... आम्ही इटलीमध्ये अगदी छान फिरत होतो. पण, यातच आमचं सामान चोरीला गेलं. याबाबत पोलिसांनाही आम्ही कळवलं. मात्र, इथं ज्या पद्धतीने भरदिवसा दरोडे टाकले जात आहेत. ते पाहून आमचा उत्साह व आशा दोन्हीही संपलंय. यानंतर पुन्हा इटलीला येण्याचं माझं आणि माझ्या लोकाचं धाडस तरी होईल का? असा प्रश्न तिनं इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना केलाय. 

पुढे तिनं लिहलं, 'आमचा दूतावास आम्हाला मदत करत आहे. पण प्रश्न हा इटलीने पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्याचा आहे. हे केवळ आमच्याबद्दल नाही तर सर्व लोकांसाठी आहे, जे इथे येण्यासाठी बचत करुन पैसे जमा करतात'.

विवेक आणि दिव्यांका हे बुधवारी फ्लॉरेन्स याठिकाणी फिरायला गेले होते. त्यांनी मुक्कामी थांबण्यासाठी जे ठिकाण निवडलं होतं, ते पाहायला दोघेही गेले होते आणि सर्व सामान बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये तसेच ठेवले होते. पण ते सामान घेण्यासाठी परत आले. तेव्हा कारमध्ये फक्त जुने कपडे व काही खाण्यापिण्याच्या वस्तू होत्या. चोरट्यांनी कारची काच फोडून त्यांचे पासपोर्ट, पर्स, पैसे, खरेदी केलेल्या वस्तू आणि जवळच्या मौल्यवान वस्तू असे १० लाख रुपयांचे सामान चोरून नेलं. या संपूर्ण घटनेनंतर विवेक दहियाने स्थानिक पोलिसांसोबत संपर्क साधला. परंतु काहीच मदत मिळाली नाही.

याप्रकाराबद्दल बोलताना विवेक म्हणाला, ' या घटनेनंतर आम्ही स्थनिक पोलीस प्रशासनासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी आमची मदत करण्यास टाळाटाळ केली. चोरी झालेल्या ठिकाणी कोणताही सीसीटीव्ही नसल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही, असं त्यांच म्हणणं होतं. शिवाय संध्याकाळी सहा वाजल्यानंतर पोलीस स्टेशन बंद होतं. त्यामुळे ते कोणतीही मदत करू शकणार नाही असं ते म्हणाले. याव्यतिरिक्त आम्ही भारतीय दुतवासाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने त्यांच्यासोबतही संपर्क होऊ शकला नाही'. सध्या दिव्यांका आणि विवेक हे सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आहेत. यासोबत तिला काहींनी तिला मदतीची विचारणा केली आहे. 

टॅग्स :दिव्यांका त्रिपाठीसेलिब्रिटीटेलिव्हिजनइटलीभारत