Join us

'दामिनी' मालिकेतील अभिनेत्री आठवतेय का? म्हणते - "दामिनीचा प्रभाव आजही तसाच आहे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 10:39 IST

दामिनीची भूमिका अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर (Pratiksha Lonkar) यांनी साकारली होती. या मालिकेतून त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली. आजही लोक त्यांना दामिनी म्हणून ओळखतात.

नव्वदच्या दशकातील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे दामिनी (Damini). ही मराठीमधील पहिली दैनंदिन मालिका होती. ही मालिकाही पत्रकारितेच्या जगतावर आधारित होती. यामध्ये दामिनीची मुख्य भूमिका अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर (Pratiksha Lonkar) यांनी साकारली होती. या मालिकेतून त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली. आजही लोक त्यांना दामिनी म्हणून ओळखतात. दरम्यान एका मुलाखतीत त्यांनी दामिनी मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला.

अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर मालिकाविश्वात सक्रीय आहेत. त्यांनी मालिका, नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात विविध भूमिका साकारल्या आहेत. नुकतेच त्यांनी आरपार ऑनलाइनला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी दामिनी मालिकेवर भाष्य केले. प्रतीक्षा लोणकर म्हणाल्या की, दामिनीच्या बाबतीत मी बोलताना सांगेन की थोडंसे त्या आदर्शवादी भूमिका होत्या. अशी मुलगी असणं शक्य आहे का, असं कदाचित वाटू शकतं, कारण थोडसं ती पत्रकार पण आहे. ती घरातलं पण थोडंसं सांभाळते. ती बहिणीसाठी ती अगदी आदर्श बहीण असते. वडिलांसाठी पण ती आदर्श मुलगी असते. थोडं चांगलं चित्र आपण दाखवायचा प्रयत्न केला किंवा ते आदर्शवादी दाखवायचा प्रयत्न केला तर ते लोकांना निश्चितपणे आवडते. 

''त्यांना ते आपलंच वाटायला लागतात''

त्या पुढे म्हणाल्या की, दामिनीमध्ये मला असं वाटतं की त्यांनी माणूसपण चांगलं ठेवलं होतं तिचं. ती जी मला दामिनीनंतर जी पत्र आली त्याच्यातून म्हणजे मला  कळलं की अरे एखादं माध्यम किती प्रभावी असू शकतं. म्हणजे त्यांच्या पत्रांमध्ये सगळीकडे अगदी म्हणजे असं की माझ्या बेंचवर बसणारी मुलगी माझ्याशी भांडलीये तर दामिनी ताई येऊन तू तिला नीट सांग भांडू नको पासून तर ते ८० वर्षांच्या आजींपर्यंत की मला माझी सून घरात नीट वागवत नाही तर तू येऊन तिच्याशी बोल. त्याच्यातून लक्षात येतं की ते कनेक्ट कसे होतात आणि मग त्यांना ते आपलंच वाटायला लागतात. एखादी मालिका तुमची तुम्हाला वाटायला लागते. तेव्हा ती मला वाटतं दीर्घकाळ लक्षात राहते.