अभिनेत्री वर्षा दांदळे (Varsha Dandale) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. नांदा सौख्य भरे या मालिकेतून त्या घराघरात पोहोचल्या आहेत. त्यांनी या मालिकेत वच्छी आत्याची भूमिका साकारली होती. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री वर्षा दांदळे यांचा अपघात झाला होता. त्यानंतर त्यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कमबॅक केले. परंतु मागील काही दिवसांपासून त्या अंथरुणाला खिळून असल्याची अफवा पसरवण्यात येत आहे. दरम्यान आता अशा अफवा पसरवण्यांवर त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
वर्षा दांदळे सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्या नेहमीच विविध फोटो टाकत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. काही महिन्यांपूर्वी वर्षा दांदळे यांच्या कारचा अपघात झाला होता. भंडारदरा येथील एका पुरस्कार सोहळ्याहून मुंबईला परताना त्यांच्या कारचा अपघात झाला होता. तेव्हापासून वर्षा या अंथरुणाला खिळून होत्या. त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरु होते. पण आता त्या ठणठणीत बऱ्या झाल्या आहेत आणि मालिकेत काम करत आहेत.