मुंबई दूरदर्शन केंद्राचे सेवानिवृत्त कार्यक्रम निर्माते विनायक चासकर यांचे ठाण्यामध्ये वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. चासकर यांनी अनेक उत्तमोत्तम कार्यक्रमांची निर्मिती केली होती. त्यांनी निर्मिती केलेला ‘गजरा’ हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय झाला होता. स्मृतिचित्रे या कार्यक्रमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. मुंबई दूरदर्शनच्या स्थापनेपासून विनायक चासकर निर्माते म्हणून रूजू झाले होते. यानंतर मुंबई दूरदर्शनच्या अनेक विभागात त्यांनी योगदान दिले. अनेक लोकप्रिय कार्यक्रमाची त्यांनी निर्मिती केली.
‘गजरा’ हा त्यांचा सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम ठरला. गजरा सादर करण्यासाठी नाटक, चित्रपट, लेखन, पत्रकारिता इ. क्षेत्रांमध्ये कामगिरी केलेल्या दिग्गजांना पाचारण करण्यात येई. या कार्यक्रमातून अनेक कलाकार लोकप्रिय झालेत. अगदी लक्ष्मीकांत बेर्डे, दिलीप प्रभावळकर, किशोर प्रधान, शोभा प्रधान, विनय आपटे, सुरेश खरे अशा कलाकारांना या कार्यक्रमाने लोकप्रियता मिळवून दिली. त्यांची निर्मिती असलेली ‘स्मृतीचित्रे’ हा कार्यक्रमही असाच गाजला होता. दूरदर्शमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी दूरदर्शनसाठीच्याच अनेक मालिकांचे दिग्दर्शन केले.