टीव्ही दुनियेतील काही मालिका इतक्या लोकप्रिय झाल्या होत्या की आजही त्या प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. आज अनेक वर्षांनंतर पुन्हा प्रसारित झाल्यानंतरही या मालिकांना प्रेक्षकांचे तितकेच उदंड प्रेम मिळतेय. आम्ही कोणत्या मालिकांबद्दल बोलतोय, हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच. होय, आम्ही बोलतोय ते रामायण व महाभारत या पौराणिक मालिकांबद्दल. आज आम्ही महाभारतातील भीष्म पितामह या पात्राबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. अर्जुनाने भीष्म पितामह यांना जखमी केले, त्यावेळी दक्षिणायन चालू होते. यामुळे भीष्म पितामह यांनी प्राणत्याग केला नाही. 58 दिवस ते बाणांच्या शय्येवर पडून होते. सूर्य उत्तरायण झाल्यानंतरच त्यांनी आपला प्राणत्याग केला होता.महाभारत या मालिकेत हे दृश्य आहे. अभिनेते मुकेश खन्ना यांनी या मालिकेत भीष्मांची भूमिका साकारली आहे. बाणांच्या शय्येवरील त्यांचा हा सीन कसा शूट झाला होता, ही एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. रवी चोप्रा यांनी एका मुलाखतीत हा इंटरेस्टिंग किस्सा ऐकवला होता.
त्यांनी सांगितले होते की, महाभारतात भीष्ण बाणांच्या शय्येवर पडून असलेले आम्हाला दाखवायचे होते. पितामह भीष्मांच्या शरीरातून आरपार गेलेले बाणही दाखवायचे होते. असे प्रत्यक्षात होणे शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही प्लेट बनवल्या होत्या. या प्लेटवर आम्ही बाणांचा खालचा भाग लावला आणि मुकेश खन्ना यांना या प्लेटवर झोपवले. त्यांच्या कपड्यांच्या आत वरच्या भागाला आम्ही दुस-या प्लेट लपवल्या होत्या. त्यात बाण लावण्यासाठी भोके केली गेली होती. त्यात बाण खोचल्यानंतर जणू सगळे बाण मुकेश खन्नांच्या शरीराच्या आरपार गेल्याचे जाणवे. ते एकदा या बाणांच्या शय्येवर अशाप्रकारे आडवे झालेत की अनेक तास त्याच अवस्थेत राहत. आम्ही प्रत्येक इंचावर बाण लावले होते. हे काम इतक्या सफाईने केले गेले होते की, शूटींगदरम्यान मुकेश यांना साधे खरचटले देखील नाही. ’
महाभारतातील मुकेश खन्ना यांनी साकारलेली भीष्माची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. खरे तर मुकेश खन्ना या मालिकेत अर्जुनाची भूमिका साकारू इच्छित होते. पण अर्जुनाची भूमिका आधीच दुस-याला दिली गेली होती. त्यामुळे मुकेश खन्ना यांना पितामह भीष्मांची भूमिका देऊ केली होती. अनेक दिवस विचार केल्यानंतर त्यांनी या भूमिकेसाठी होकार दिला होता.