'स्वराज्य रक्षक संभाजी' ही अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मालिका आता प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार आहे. 2018 ला सुरू झालेल्या या मालिकेने रसिकांच्या मनावर जवळपास दोन वर्षं अधिराज्य गाजवले. या मालिकेतून संभाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकण्यात आला. ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेचा शेवटचा भाग प्रेक्षकांना फेब्रुवारी महिन्यात पाहायला मिळणार आहे. ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून टीआरपीच्या चार्टमध्ये पहिल्या पाचमध्ये आहे. यंदाच्या आठवड्यात तर या मालिकेने सगळ्या मालिकांना मागे टाकत पहिले स्थान पटकावले आहे. ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने या मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत असलेले डॉ. अमोल कोल्हे चांगलेच भावुक झाले आहेत. त्यांनी ट्वीटवर त्यांच्या या मालिकेतील गेटअपमध्ये एक व्हिडिओ शेअर करत एक प्रवास कधीच न विसरता येणारा...... असे लिहिले आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ केवळ काहीच तासांत 12 हजाराहून लोकांनी पाहिला असून ही मालिका आजवरच्या सगळ्या मालिकांपेक्षा उत्कृष्ट होती... ही मालिका आम्ही कधीच विसरू शकत नाही असे प्रेक्षक कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. तसेच संभाजी महाराजांचा इतिहास या मालिकेद्वारे लोकांच्यासमोर मांडण्यात आला असल्याने प्रेक्षकांनी डॉ. अमोल कोल्हे आणि त्यांच्या टीमचे आभार मानले आहेत.
'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेत डॉ. अमोल कोल्हेंसोबतच शंतनू मोघे, प्राजक्ता गायकवाड यांच्या अभिनयाचे कौतुक झाले होते.