१४ फेब्रुवारी २०२५ ला 'छावा' सिनेमा (chhaava movie) रिलीज झाला. विकी कौशलने (vicky kaushal) छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. 'छावा' सिनेमाचा विषय आणि सिनेमाचा वेदनादायी क्लायमॅक्स पाहून सर्वांचे डोळे पाणावले. शिवप्रेमींनी 'छावा' सिनेमाला चांगलीच पसंती दिलीय. अशातच गेल्या काही दिवसांमध्ये 'छावा' निमित्ताने डॉ. अमोल कोल्हेंच्या 'स्वराज्यरक्षक संभाजी' (swarajyarakshak sambhaji) मालिकेची चांगलीच चर्चा आहे.
या मालिकेत छत्रपती शंभूराजेंना कैद झाल्यानंतर पुढे औरंगजेबाने त्यांचा कसा छळ केला हे दाखवण्यात आलं नाही. या मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला अशी चर्चा रंगली. याविषयी डॉ. अमोल कोल्हेंनी त्यांच्या युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून मोठा खुलासाा केलाय.
"हो माझ्यावर दबाव"- डॉ. अमोल कोल्हे
डॉ. अमोल कोल्हेंनी युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून हा खुलासा केलाय. "मालिकेच्या टीमने आऊट ऑफ द वे जाऊन काम केलंय. त्यामुळे जेव्हा मालिकेच्या हेतूविषयी प्रश्न उपस्थित केला जातो तेव्हा उत्तर देणं गरजेचं असतं. कारण मग काहीजणांचा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते. होय..! स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचा शेवट ठराविक पद्धतीने दाखवावा याविषयी माझ्यावर आणि माझ्या टीमवर दबाव होता. अनेकांना धक्का बसेल. पण हा दबाव नेमका कसला? हा दबाव होता माध्यमाचा."
"टीव्ही सीरियल, चित्रपट आणि ओटीटी ही तीन माध्यमं वेगवेगळी आहेत. नाटक हे वेगळं माध्यम आहे. त्यामुळे आपण कोणत्या माध्यमावर सादरीकरण करतोय त्या माध्यमाचा निश्चितच दबाव होता. कारण याची रेग्युलेटरी बॉडी बघितली तर याचा तपशील तुम्हाला मिळेल. त्याला आम्ही S & P म्हणतो. या S & P च्या गाईडलाईन्सनुसार तुम्हाला मालिका दाखवावी लागते. मालिकेमध्ये हिंसाचार, रक्त किती प्रमाणात दाखवायचं या सगळ्या गाईडलाईन्स असतात. त्यामध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालय, TRAI, BCCC या सगळ्या गोष्टी असतात. केबल टेलिव्हिजन नेटवर्क अॅक्ट १९९५ च्या गाईडलाईन्स असतात.""मालिकेमध्ये S & P च्या मर्यादा होत्या. त्यामुळे हा दबाव माध्यमांचा होता. दुसरा होता तो नैतिक दबाव. राजा शिवछत्रपती मालिका जेव्हा सुरु होती तेव्हा फार मोठे अधिकारी मला भेटायला आले होते. त्यांच्या पत्नीने मला प्रसंग सांगितला की, मिर्झाराजा जयसिंगाच्या छावणीत जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज मान खाली घालून तहाच्या वेळी उभे राहत होते तो प्रसंग तीन-चार एपिसोड चालला होता. तीन-चार दिवस तो तहाचा एपिसोड बघताना ते अधिकारी जेवत नव्हते. ते इतके अस्वस्थ झाले होते. त्यामुळे हा परिणाम तुम्हाला कायम लक्षात ठेवावा लागतो. टेलिव्हिजन करत असताना टू प्लस मार्केट समजलं जातं. दोन वर्षाच्या मुलापासून अनेक सर्व गोष्टींचा विचार केला जातो. त्यांच्यावर या दृश्यांचा काय परिणाम होईल ही नैतिक जबाबदारी होती."
"छत्रपती संभाजी महाराजांवरचे अत्याचार हे प्रतिकात्मक पद्धतीने, वर्णनात्मक दाखवले गेले. तापलेल्या सळ्या, जमिनीवर पडलेले रक्ताचे थेंब असं तुम्हाला मालिकेत दिसलं. जेव्हा मालिका घराघरात पाहिली जाते तेव्हा शेवटाविषयी प्रश्न विचारणाऱ्यांनी एकदा आपल्या आईला-बहिणीला प्रश्न विचारा की, जर शंभूराजांवर ४० दिवस झालेले अत्याचार रोज टेलिव्हिजनवर दाखवले असते तर तुम्हाला आवडलं असतं का? तुम्हाला ते पाहवलं असतं का? त्यामुळे या मालिकेच्या शेवटाविषयी जे कोणी प्रश्न विचारतात त्यांच्या विकृत मानसिकतेविषयी संताप आल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला खरोखर काय पाहायचं होतं? छत्रपती संभाजी महाराजांवर त्या औरंग्याने कसे क्रूर अत्याचार केले हे तुम्हाला पाहायचं होतं? कशासाठी? आनंद मिळणार होता तुम्हाला?"
"माझी ही भावना आहे की, जेव्हा प्रेक्षक हे महानाट्य अनुभवून जात असतात तेव्हा जाताना त्यांनी माझ्या धाकल्या धन्याचा छत्रपती संभाजी महाराजांचा तोच राजबिंडा अवतार बघावा. तेच राजबिंड रुप, त्या स्वराज्याचा छाव्याचं रुप मनात साठवावं. म्हणून २०-२२ मिनिटांचा बलिदानाचा प्रसंग महानाट्यात झाल्यावर अवघ्या दोन मिनिटांमध्ये भरजरी पोशाख करुन घोड्यावर स्वार होऊन शंभूराजे प्रेक्षागृहात अवतरतात.
"जेणेकरून येणाऱ्या लहानग्यांना छत्रपती संभाजी महाराजांची आठवण अन् स्मृती त्याच राजबिंड्या रुपात राहावी. ही मानसिकता, भावना असेल तर यानंतरही हेतूवर प्रश्न कोणी उपस्थित करत असतील तर मला त्यांच्या मानसिकतेची कीव करावीशी वाटते." अशाप्रकारे डॉ. अमोल कोल्हेंनी हा खुलासा केला.