झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. सुरुवातीपासूनच या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. कुठलीही ऐतिहासिक भूमिका प्रेक्षकांना पटेल अशी निभावणं हे कलाकारासाठी आव्हानात्मक असतं आणि तीच भूमिका सहजरित्या निभावणं हे त्या कलाकाराचं यश आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांच्या डोळ्यांपुढे उभा करण्यात यशस्वी झालंय.
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून अभिनेता आणि निर्माता या दोन्ही भूमिका निभावल्यानंतर अभिनेते अमोल कोल्हे यांनी निवडणुकीच्या रिंगणात बाजी मारली असून ते आता खासदार बनले आहेत. आता त्यांची स्वराज्यजननी जिजामाता ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्वराज्याचा रक्षणकर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवबांच्या जडण-घडणीत सगळ्यात मोठा वाटा राजमाता जिजाऊंचा होता. जिथे-जिथे स्वराज्याबद्दल बोललं जातं तिथे-तिथे या रयतेच्या राजाचा उल्लेख हा होतोच. आपली लढाई लढण्याचं बळ ज्या माऊलीमुळे शिवबाच्या पखांमध्ये आलं ती जिजाऊ. शिवबा ते छत्रपती शिवाजी महाराज हा लढवय्या घडवणाऱ्या त्या माऊलीचा या प्रवासात मोलाचा वाटा होता. याच माऊलीच्या कर्तृत्त्वाला सलाम करत सोनी मराठी स्वराज्यजननी जिजामाताच्या निमित्ताने या वीरमातेची जीवनगाथा प्रेक्षकांसमोर मांडणार आहे.
स्वराज्यजननी जिजामाता असे या मालिकेचे नाव असून 19 ऑगस्टपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेविषयी डॉ. अमोल कोल्हे यांनीच सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना सांगितले आहे. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेची निर्मिती जगदंबा क्रिएशनने केली असून या प्रोडक्शन हाऊसची ही दुसरी मालिका आहे. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेनंतर एक वेगळं शिवधनुष्य पेलण्याचे आव्हान या मालिकेद्वारे आम्ही स्वीकारत आहोत. शहाजीराजांची स्वराज्यसंकल्पना ज्यांनी जपली, जोपासली आणि स्वराज्यसंस्थापक शिवरायांना घडवलं त्या जिजाऊ माँसाहेबांचं जीवनचरित्र प्रेक्षकांसमोर आणणं सोनी मराठीच्या माध्यमातून शक्य होत आहे ही आनंदाची बाब आहे आणि तितकीच जबाबदारीचीही! ही मालिका केवळ मनोरंजन नाही तर संस्कार असेल आणि तमाम जिजाऊंच्या लेकींसाठी अभिमानाचा हुंकार असेल!
सोनी मराठीवर सादर होणाऱ्या या स्वराज्य जननीच्या रूपात अमृता पवार ही अभिनेत्री दिसणार आहे.