Join us  

कुटुंबाच्या अन्यायासाठी लढणाऱ्या मुलीची कथा! सुप्रसिद्ध गीतकाराची मुलगी प्रमुख भूमिकेत, प्रोमो रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 10:57 AM

कलर्स मराठीवर काल नव्या मालिकेची घोषणा झाली असून कुटुंबाच्या अन्यायासाठी लढणाऱ्या मुलीची गोष्ट पाहायला मिळणार आहे (durga, rumani khare)

काल कलर्स मराठीचं रंगरुप पालटलं. नवीन ढंंगात कलर्स मराठीची घोषणा करण्यात आली. यावेळी काल नवीन मालिकेची घोषणा करण्यात आली. काल बिग बॉस मराठी सुरु असताना मधल्या वेळात रितेशने कलर्स मराठीचं रुप बदललं असल्याचं सांगितलंच शिवाय मधल्या ब्रेकमध्ये नवीन मालिकेची घोषणा करण्यात आली. दुर्गा असं या नवीन मालिकेचं नाव असून या मालिकेतून एका सुप्रसिद्ध गीतकाराची मुलगी मालिकाविश्वात पदार्पण करतेय. 

दुर्गा मालिकेचा दमदार प्रोमो रिलीज

काही दिवसांपूर्वीच अंगावर शहारे आणणारा महाराष्ट्राची कुलस्वामिनी 'आई तुळजाभवानी' मालिकेचा टीझर आऊट झाला. अशातच आता 'कलर्स मराठी'च्या नव्या प्रवासाचा 'दुर्गा' ही नवी मालिकादेखील भाग असणार आहे. या मालिकेचा दमदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  सुख आणि सूड अशा द्वंद्वात अडकलेली, आपल्या कुटुंबासाठी सर्वकाही पणाला लावून त्यांना न्याय मिळावा म्हणून लढणाऱ्या दुर्गावर आधारित ही मालिका आहे.  आपल्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध दुर्गा कशी घेणार हे जाणून घेणे उत्सुकतेचे असणार आहे.

संदीप खरेंची मुलगी प्रमुख भूमिकेत

दुर्गाच्या भूमिकेत संदीप खरे यांची मुलगी रुमानी खरे झळकणार असून मालिकेचा नायक अभिषेकची भूमिका अंबर गणपुले साकारणार आहे. तसेच शिल्पा नवलकर, राजेंद्र शिसतकर आणि वृंदा गजेंद्र देखील महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 'दुर्गा' हे पात्र साकारणारी रूमानी खरे म्हणाली ,"मालिकेचं कथानक ऐकल्या क्षणी आवडलं.'दुर्गा' हे पात्र वेगळं आहे. स्वत:ची मतं ठामपणे मांडू शकणारी, स्वत:साठी उभी राहणारी अशी 'दुर्गा' आहे. 'दुर्गा'च्या माध्यमातून चांगल्या माणसांसोबत छान काम करता येत आहे. मुळात कोणतीही गोष्ट उभी राहताना पडद्यामागच्या कलाकारांची मेहनत खूप महत्त्वाची असते. सेटवर असणारी सकारात्मकता उत्तम काम करण्यासाठी प्रोत्साहन देते. 'दुर्गा' हे पात्र साकारताना मला मजा येतेय. प्रेक्षकांनादेखील हे पात्र नक्कीच आवडेल".

टॅग्स :कलर्स मराठीसंदीप खरे