अर्जित तनेजाने स्वत:च ठरविला ‘कलीरें’मालिकेतील आपला लूक!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2018 11:13 AM
छोट्या पडद्यावरली ‘कलीरें’ या आगामी मालिकेत आपण जसे आहोत, तसेच आपल्याला इतरांनी स्वीकारण्याबाबत ठाम राहणे आणि भावी सासरच्या मंडळींच्या ...
छोट्या पडद्यावरली ‘कलीरें’ या आगामी मालिकेत आपण जसे आहोत, तसेच आपल्याला इतरांनी स्वीकारण्याबाबत ठाम राहणे आणि भावी सासरच्या मंडळींच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी लग्नापूर्वी आपल्या सवयींमध्ये बदल घडवून आणण्याच्या प्रथेविरोधात आवाज उठविण्यात आला आहे.पंजाबमधील एका खेड्यात राहणाऱ्या मीरा नावाच्या मुलीची ही कथा आहे.उत्तम पती मिळावा,यासाठी काही कौशल्ये शिकविणाऱ्या आणि आपल्या सवयींमध्ये बदल घडविणाऱ्या प्रशिक्षण संस्थांचे पंजाबमध्ये सध्या पेव फुटले आहे. लग्नापूर्वी स्वत:त मुद्दाम बदल घडविण्याच्या या प्रथेला मीराचा विरोध असतो.या मालिकेत मीराची भूमिका आदिती शर्मा ही नवोदित अभिनेत्री साकारीत असून टीव्हीवरील बांधेसूद देहयष्टीचा देखणा अभिनेता अर्जित तनेजा हा नायक विवान कपूरची भूमिका रंगविणार आहे.लंडनस्थित एनआरआय विवान हा धूर्त उद्योगपती असून त्याला भारतात येणे अजिबात आवडत नसते.तसेच तो स्वभावाने अतिशय मग्रूर आणि आपल्या मार्गात आडवे येणाऱ्या लोकांशी दोन हात करणाऱ्या स्वभावाचा असतो.मात्र आपल्या बहिणीबद्दल तो अतिशय हळवा होतो.पण त्याचे सर्वाधिक प्रेम आपण कसे दिसतो, यावर असते.कपडे असोत की आपली देहयष्टी, ते सारे अतिशय सुंदरच असले पाहिजे, यावर त्याचा कटाक्ष असतो. यापूर्वी ‘झी टीव्ही’वरील ‘कुमकुम भाग्य’ मालिकेत भूमिका रंगविलेल्या अर्जित तनेजासाठी कालीरेन मालिका आणि त्यातील विवान कपूरची भूमिका ही खास महत्त्वाची आहे. गेले 8-10 महिने इंडोनेशियातील काही वैयक्तिक कामासाठी त्याने भारतीय टीव्हीवरील अभिनयातून निवृत्ती स्वीकारली होती. आता तो त्या कामातून मुक्त होऊन पुन्हा मुंबईत परतला असून त्याने सांगितले की आपल्याला ‘कलीरें’ मालिकेतील भूमिका पहिल्या प्रयत्नातच मिळाली. या मालिकेचे प्रोमो सध्या प्रसारित होत असून त्यात अर्जितने आपल्या व्यक्तिमत्त्वाची एक अज्ञात बाजू प्रथमच उघड केली आहे. या मालिकेतील आपली वेशभूषा त्याने स्वत:च ठरविली आहे.आपल्या लूकबद्दल अर्जित तनेजाने सांगितले, “विवान हा लंडनस्थित एनआरआय असून त्याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन अगदी आधुनिक आहे.त्याला सदैव तंदुरुस्त राहायला आणि आरोग्यदायक जीवनशैली स्वीकारायला आवडत असतं.तो नेहमीच टापटिप औपचारिक कपड्यांमध्ये वावरतो.अभिनयाच्या कारकीर्दीला प्रारंभ करण्यापूर्वीच मला कपड्यांच्या डिझाईनमध्ये स्वारस्य होते आणि माझ्या कपड्यांचे डिझायनिंग मीच करीत असे.मी जेव्हा विवानच्या व्यक्तिरेखेचा आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेतला,तेव्हा विवान कसा दिसला पाहिजे, याबद्दल मी काही आडाखे बांधले आणि आमच्या सर्जनशील टीमशी त्यावर चर्चा केली. त्यानंतर विवानचे कपडे आणि एकंदर लूक कसा असावा,यावर आमचं एकमत झालं आणि त्या निर्णयाबाबत मी समाधानी आहे.‘कालीरेन’मधील विवानच्या व्यक्तिरेखेचा लूक त्याच्या व्यक्तिमत्त्वाशी योग्य प्रकारे जुळत असल्याचं प्रेक्षकांना वाटेल,अशी मला आशा आहे.”