मुंबई - बिग बॉस विजेता मुनव्वर फारुखी हा कुठल्या ना कुठल्या कारणामुळे वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडत असतो. काही दिवसांपूर्वी तो हुक्का पिताना सापडला होता. तर काल मुंबईतील पायधुनी परिसरात मुनव्वर फारुखी आणि एका हॉटेल मालकामध्ये वाद झाला. त्यावेळी एका हॉटेल मालकासह कामगारांनी त्याच्या दिशेने अंडी फेकून मारली. तसेच, बेकायदा जमाव जमवून त्याला शिवीगाळ करत दमदाटी केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी पायधुनी पोलिसांनी गुन्हा नोंदवत ७ जणांना अटक केली आहे. तसेच, अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.
पायधुनी परिसरात राहणारे अख्तर रझा नुरानी (३०) यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. मंगळवारी बिग बॉस विजेता मुनव्वर फारुखी (३०) हा नुरानीसोबत मिनारा मस्जिदजवळील एका मिठाईच्या दुकानात गेला. मात्र आपण बोलावून आपल्याकडे न येता दुसरीकडे गेल्याच्या रागात हॉटेलचे मालक अब्दुल्ला नासीर शेख व रेहमान नासीर शेख व त्यांचा मॅनेजर अमीन हनीफ शेख तसेच कामगार नसिम आलम खान (२४), साजीद सलीम खान (३३), मोहम्मद शरीफ अली शेर (४०) आणि अनिजुल मोहम्मद शुकरू देवगन (२३) यांच्यासह अन्य साथीदारांनी फारुखी विरोधात राग व्यक्त केला.
यावेळी त्यांच्यावर अंडी फेकून मारली. त्याला दुखापत करण्यासाठी गैरकायद्याची मंडळी जमवून दमदाटी केल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नुरानीच्या तक्रारीवरून पायधुनी पोलिसांनी बेकायदेशीर जमाव केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
याप्रकरणी अब्दुला नासीर शेख, रहेमान नासीर शेख, अमीन हनीफ शेख, नसिम आलम खान, साजिद खान, मोहम्मद शरीफ अली शेर आणि अनिजुल मोहम्मद शकरू या आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी माशाअल्ला हॉटेलमधील असल्याचे सांगितले. त्यांना अटक दाखवून नोटीस देत सोडण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये संबंधित हॉटेलचालक आणि मुनव्वर फारुखीमध्ये जोरदार वादावादी होताना दिसत आहे.