'एक घर मंतरलेलं' ही मालिका छोट्या पडद्यावर आता रंजक वळणावर आली आहे. मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. मृत्युंजय बंगल्याचं गूढ, त्याचा गार्गीच्या आयुष्याशी आलेला संबंध आणि तिच्या आयुष्यात घडत असलेल्या अनाकलनीय घटना यांनी प्रेक्षकांवर जादू केलेली आहे. सर्वांनाच खिळवून ठेवणाऱ्या या मालिकेत एक नवे पात्र यापुढे पाहायला मिळेल.
सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर हे पात्र साकारणार आहेत. श्रीमती तारकर असे या नव्या पात्राचे नाव आहे. भास-आभास या कार्यक्रमा संदर्भात गार्गीला एक फोन येतो व दिलेल्या पत्त्यावर ती श्रीमती तारकर यांना भेटायला जाते. परंतु त्यांना भेटून झाल्यानंतर, ती व्यक्ती १० वर्षांपूर्वीच मेलेली असल्याचं गार्गीला कळतं. मालिकेत या नव्या पात्राचा झालेला प्रवेश काय नवीन बदल घडवून आणतो याचा उलगडा लवकरच होणार आहे.
भास-आभास कार्यक्रमाच्या निमित्ताने एक फोन आल्यामुळे गार्गी एका ठिकाणी श्रीमती तारकर यांना भेटते. पण, घराबद्दलची माहिती दिल्यानंतर त्या अचानक अदृश्य होतात. ज्यांच्याशी बराच वेळ संवाद साधला, त्या तारकर यांचा दहा वर्षांपूर्वीच मृत्यू झाला असल्याचे, घरात राहत असलेल्या जोडप्याकडून गार्गीला कळते. त्यामुळेच नवे संकट समोर आल्याची जाणीव गार्गीला झालेली आहे. गार्गीसमोर उभे ठाकणारे हे एकमेव नवे संकट मात्र नाही. मंतरलेल्या कड्याच्या साहाय्याने समीक्षा भानावर येऊन मृत्युंजयमधून पळून गेली आहे. ज्या अवनीमुळे हे घडलं आहे तिचा मात्र या सगळ्यात मृत्यू होतो. गार्गीला झालेले भास आणि अवनीचा झालेला मृत्यू यांच्यात बरेच साम्य आहे. हे नवे संकट सुद्धा गार्गीच्या आयुष्यात नवे वादळ घेऊन येणार का? नवे पात्र आल्यामुळे गार्गीच्या आयुष्यात काय नवे बदल घडणार? हे आगामी भागात पाहायला मिळणार आहे.