'एक घर मंतरलेलं' ही रहस्यकथेपैकी एक आहे. मृत्युंजय बंगल्याचं गूढ, त्याचा गार्गीच्या आयुष्याशी आलेला संबंध आणि तिच्या आयुष्यात घडत असलेल्या अनाकलनीय घटना यांनी प्रेक्षकांवर जादू केलेली आहे. सर्वांनाच खिळवून ठेवणाऱ्या या मालिकेत एक नवे पात्र नुकतंच प्रेक्षकांना पाहायला मिळाले. 'मृत्युंजय'चे रहस्य अधिकच गुंतागुंतीचे होत असतांना, ते सोडवण्यासाठी गार्गीला हे पात्र मदत करतंय. नरहरी खंडागळे या सरकारी अधिकाऱ्याचे हे पात्र अभिनेता सुनील बर्वे साकारत आहेत.
खंडागळे यांनी लिहिलेला मजकूर गार्गीच्या हाती लागला आहे. म्हणूनच गार्गी त्यांच्या शोधात आहे. सुनील बर्वे साकारत असलेला नरहरी खंडागळे, 'मृत्युंजय' बंगल्याविषयीचे गूढ सोडवण्यासाठी उपयोगी असलेल्या काही फार महत्त्वाच्या गोष्टींची माहिती गार्गीला देणार आहे. तिला नेमकी काय माहिती मिळते व त्यामुळे तिला काय फायदा होतो हे बघणे प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे. खंडागळे आणि गार्गी यांच्यात घडणारे संभाषण या रहस्याच्या शोधला नवी कलाटणी देणारे ठरेल. वाड्याचे रहस्य सोडवत असतांना नवेनवे दुवे गार्गी गोळा करत आहे.
तसेच दिवसेंदिवस या मालिकेत वेगवेगळे वळण पाहायला मिळत आहे. या मालिकेत सुरुची अडारकर गार्गी महाजन ह्या पत्रकाराची भूमिका निभावत आहे. मालिकेत सुयश टिळकचीही एंट्री झाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा सुयश आणि सुरुची या दोघांची लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा रसिकांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळाली.