Join us

कुणी काम देतं का काम..!, असं म्हणण्याची वेळ आलीय 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' मालिकेतल्या अभिनेत्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 13:21 IST

मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्याने चित्रपट, नाटक आणि मालिका अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे.

कलाकार बऱ्याचदा सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. कधीकधी ते आपला आनंद शेअर करतात तर कधी कधी खंतदेखील व्यक्त करतात. काही कलाकार काम मिळावं यासाठीदेखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करतात. दरम्यान आता एका मराठी अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चांंगल्या कामाच्या शोधात असल्याचे सांगितले आहे. हा अभिनेता म्हणजे एका लग्नाची दुसरी गोष्ट मालिकेत प्रभातची भूमिका साकारणारा श्रीकार पीत्रे (Shrikar Pitre). 

अभिनेता श्रीकार पीत्रे याने चित्रपट, नाटक आणि मालिका अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. त्याने एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत प्रभातची भूमिका केली होती. आजही त्याला या भूमिकेमुळे ओळखले जाते. याशिवाय त्याने ‘चुभन’, ‘इश्क वाला लव्ह’ अशा काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. पण सध्या त्याच्याकडे काहीच काम नव्हते. तो कामाच्या शोधात असून त्याने शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

श्रीकार पीत्रे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत लिहिले की, नमस्कार खूप दिवस झाले इथे पोस्ट टाकावी का नको ह्या संभ्रमात होतो.पण म्हणलं एक प्रामाणिक प्रयत्न करून बघुया.कामं शोधण्याचे अनेक प्रयत्न झाले.. मला अभिनय करायचा आहे, आणि मी चांगल्या कामाच्या शोधात आहे.  कोणाकडे माझ्यासाठी काही चांगला रोल असल्यास कृपया मला संपर्क साधावा. 

श्रीकार पीत्रेच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेक कलाकार मंडळींनीही या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत.