Ekta Kapoor : प्रसिद्ध चित्रपट आणि मालिका निर्माती एकता कपूरला भारतीय टेलिव्हिजनमधील कारकिर्दीसाठी 51व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये सन्मानित करण्यात येणार आहे. भारताची कंटेंट क्वीन आणि टेलिव्हिजन प्रॉडक्शन पॉवरहाऊस 'बालाजी टेलिफिल्म्स'ची सह-संस्थापक एकता कपूरला 2023 चा इंटरनॅशनल एमी डायरेक्टरेट अवॉर्ड मिळेल, अशी घोषणा 'इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्स'चे अध्यक्ष आणि सीईओ ब्रूस एल पासनर यांनी 29 ऑगस्ट रोजी केली. 20 नोव्हेंबर 2023 रोजी न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या 51व्या आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्समध्ये एकता कपूरलाला अवॉर्ड दिला जाईल.
एकता कपूरला सन्मान मिळणे भारतासाठीही मोठी गोष्ट आहे. कारण, हा सन्मान मिळवणारी एकता कपूर ही पहिली भारतीय महिला असेल. भारतीय टेलिव्हिजन उद्योगातील तिच्या योगदानाबद्दल तिला हा पुरस्कार मिळणार आहे. ब्रूस एल पेसनर म्हणाले की, एकता कपूरने तिच्या प्रॉडक्शन हाऊस, बालाजी टेलिफिल्म्सद्वारे भारतातील लाखो-करोडो लोकांचे मनोरंजन केले आहे. तिच्या बालाजी टेलिफिल्म्स अंतर्गत निर्माण होणारा कंटेट भारतासह दक्षिण आशियामध्ये लोकप्रिय आहेत.
1994 मध्ये बालाजी टेलिफिल्म्स सुरू एकता कपूरने तिचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि आई शोभा कपूर यांच्यासोबत 1994 मध्ये बालाजी टेलिफिल्म्सची सुरुवात केली. एकता कपूरचे वडील जितेंद्र निर्माते तर शोभा कपूर मीडिया एक्झिक्युटिव्ह म्हणून काम पाहते. भारतात सॅटेलाइट टीव्ही उद्योग सुरू झाल्यानंतर, एकताने तिच्या मालिकांद्वारे लाखो लोकांचे मनोरंजन केले. बालाजी बॅनरखाली तिने 17,000 तासांपेक्षा जास्त काळ चाललेले शो आणि सुमारे 45 चित्रपटांची निर्मिती केली. याशिवाय तिने भारतातील पहिले OTT प्लॅटफॉर्म- ALT बालाजी लॉन्च केले.
टीव्हीमुळे मला ओळख मिळाली: एकता कपूरया पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना एकता कपूर म्हणाली, मला हा पुरस्कार मिळणार आहे, याचा मला खूप आनंद आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी खूप खास आहे. याचे माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातही विशेष महत्त्व आहे. टीव्हीने मला ओळख दिली आहे. या जागतिक मंचावर मी माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणार, याचा मला आनंद आहे.