एकता कपूरची (Ekta Kapoor) सर्वात गाजलेली मालिका 'क्योंकी सांस भी कभी बहू थी' चा दुसरा सीझन लवकरच येणार अशी चर्चा होती. यामध्येही स्मृती ईरानी तुलसी विरानी या भूमिकेत दिसणार आहे. घरोघरी पाहिली जाणारी ही मालिका आता पुन्हा येत असल्याने प्रेक्षकही उत्सुक आहेत. नुकतंच मालिकेची निर्माती एकता कपूरने दुसऱ्या सीझनची बातमी कन्फर्म केली आहे. नुकतंच तिने याबाबती अधिक माहिती दिली.
हिंदुस्तान टाइम्स रिपोर्टनुसार, एकता कपूरने 'क्योंकी सांस भी कभी बहू थी'च्या कमबॅकवर शिक्कामोर्तब केलं आहे. तसंच हा सीझन केवळ १५० एपिसोड्सचा असणार आहे असाही तिने खुलासा केला. एकता कपूर म्हणाली,"तेव्हा मालिकेचे १८५० एपिसोड्स झाले आणि मालिकेने निरोप घेतला होता. म्हणजेच मालिकेला २००० चा टप्पा गाठण्यासाठी १५० एपिसोड्सचंच कमी पडत होते. तेच आता आम्ही पूर्ण करु. म्हणूनच दुसरा सीझन १५० एपिसोड्सचा करत २००० चा टप्पा पूर्ण करण्याची योजना आहे. हा शो त्यासाठी पात्र आहे. शोमध्ये एक राजकारणीही असणार आहे. आम्ही राजकारण मनोरंजनात आणत आहोत, किंवा आम्ही राजकारणी व्यक्तीला मनोरंजनात आणत आहोत असं म्हणता येईल."
एकता कपूरच्या माहितीवरुन ती राजकारणी व्यक्ती स्मृती इरानीच असणार हे कन्फर्म झालं आहे. मालिकेत अमर उपाध्याय मिहिर विरानीच्या भूमिकेत दिसणार का यावर एकताने काहीच कन्फर्म केलेलं नाही. हितेन तेजवानी, अमर उपाध्याय आणि रोनित रॉयसोबत चर्चा सुरु आहे.