भारतीय टीव्हीवरही अनेक लोकप्रिय नायक व खलनायक होऊन गेले आहेत. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माती एकता कपूरनेही कोमोलिकाच्या रूपाने भारतीय टीव्ही मालिकांमध्ये एका अजरामर खलनायिकेची भर टाकली आहे. प्रेरणा आणि अनुराग या प्रेमी युगुलाच्या जीवनात विष कालविण्यासाठी विविध कट कारस्थाने रचणाऱ्या कोमोलिका या खलनायिकेचा तिरस्कार करण्यास भारतीय प्रेक्षकांना खूप आवडते. तिच्या या दुष्ट कारस्थानांचे सूतोवाच आणि प्रत्यक्ष कृती यांचे चित्रणही वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने सादर करण्यात आल्याने तिच्याबद्दल प्रेक्षकांच्या मनात निर्माण होणारा तिरस्कार वाढण्यात मदतच झाली.
नामवंत अभिनेत्री उर्वशी ढोलकियाने सर्वप्रथम कोमोलिकाची व्यक्तिरेखा साकारारून तिच्यातील खलप्रवृत्तीचे दर्शन प्रेक्षकांना घडविले होते. पुढे काही वर्षांच्या खंडानंतर कसौटी झिंदगी के ही मालिका नव्या संचात प्रसारित झाली, तेव्हा प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान हिने ही भूमिका बजावून तिला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते.
आता आमना शरीफ या आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीवर कोमोलिका उभी करण्याची जबाबदारी येऊन पडली आहे आणि ही व्यक्तिरेखेची खलनायिका पण तितक्याच जोमाने साकार करण्यास तिने कोणतीही कसर शिल्लक न ठेवण्याचा निश्चय केला आहे.
एकता कपूरलाही आमनाने साकारलेली कोमोलिका आवडली असून त्याबद्दल ती म्हणाली, “आमना आता कोमोलिकाच्या व्यक्तिरेखेत व्यवस्थित रुळली आहे. भारतीय टीव्हीवर कोमोलिका ही एक खास खलनायकी व्यक्तिरेखा म्हणून मान्यता पावली असून खलनायकाची भूमिका रंगविणं हे कधीच सोपं नसतं. पण आमनाने ही भूमिका अशी उभी केली आहे की जणू तिचा जन्मच या भूमिकेसाठी झाला आहे. मला अभिनेत्यांची निवड करण्यास आवडत नाही, पण तशी करायचीच असेल, तर मी म्हणेन की मला कोमोलिकाच्या रूपातील आमना खूप आवडली. तिने या व्यक्तिरेखेला स्वत:चा स्पर्श दिला आहे.”