'क्योंकी सास भी कभी बहू थी' ही मालिका प्रचंड गाजली. एकता कपूरच्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. रात्री प्रत्येक घरात टीव्हीवर ही मालिका पाहिली जायची. मालिकेतील तुलसी-मिहीरची जोडी प्रचंड हिट ठरली होती. या मालिकेतूनच तुलसीची भूमिका साकारून स्मृती इराणी घराघरात पोहोचल्या. आता पुन्हा एकदा एकता कपूरची ही मालिका आणि स्मृती इराणी आपल्या भेटीला येत आहेत.
एकता कपूर पुन्हा एकदा 'क्योंकी सास भी कभी बहू थी' मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेची स्टारकास्टही तीच असल्याचं 'पिंकविला'ने दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं आहे. पण, यंदा ही मालिका काही ठराविक भागांची असल्याचं म्हणण्यात आलं आहे. त्यासोबतच मालिकेत तुलसीच्या भूमिकेत स्मृती इराणी आणि मिहीरच्या भूमिकेत अमर उपाध्याय दिसणार आहेत. यासाठी स्मृती इराणी तयारीदेखील करत आहेत. या मालिकेची सुरुवातही जुन्या 'क्योंकी सास भी कभी बहू थी' सारखीच तुलसी घराचा दरवाजा उघडत होणार आहे.
'क्योंकी सास भी कभी बहू थी' मालिका स्टार प्लसवर प्रसारित होत होती. तब्बल ८ वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. २००० साली मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला होता. तर २००८ साली एकता कपूरच्या या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.