Join us

'या' कारणामुळे एकता कपूरने केली 'कसौटी जिंदगी की' मालिकेची निर्मिती, कारण वाचून व्हाल आवाक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 9:30 PM

'कसौटी जिंदगी की' ही मालिका आता वेगळ्याच वळणावर पोहचली आहे. प्रेरणाचा जिवलग जोडीदार अनुराग बसू कोमोलिकाशी लग्न करून प्रेरणाला जबरदस्त धक्का देतो. त्यामुळे प्रेरणाच्या जीवनात संपूर्ण उलथापालथ होते.

‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतील प्रेरणा साकारत असलेल्या एरिका फर्नांडिसने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली आहे. कथानकामधील रंगतदार वळण यामुळे ही मालिका रसिकांच्या मनात घर करुन आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांना भावली आहे. ही मालिका आता वेगळ्याच वळणावर पोहचली आहे. प्रेरणाचा जिवलग जोडीदार अनुराग बसू कोमोलिकाशी लग्न करून प्रेरणाला जबरदस्त धक्का देतो. त्यामुळे प्रेरणाच्या जीवनात संपूर्ण उलथापालथ होते. पण यामुळेच प्रेरणाचे रुपांतर एका कणखर आणि शक्तिशाली महिलेत होते. महिलांनी नेहमी असेच बिनधास्त राहवे असे ती सांगते. एरिका फर्नांडिसने आपल्या मालिकेची निर्माती एकता कपूरची भेट घेतली आणि तिच्याकडून प्रेरणाच्या स्वभावाची ही दुसरी, कठोर बाजू जाणून घेण्यासाठी चर्चा केली.

 

प्रेरणाच्या व्यक्तिरेखेत अलीकडेच झालेल्या या आमूलाग्र बदलाबद्दल एकता कपूर म्हणाली, “माझा स्वत:चा प्रेमभंग झाला होता, अशा अवस्थेत असताना मी ‘कसौटी जिंदगी के’ या मालिकेची निर्मिती केली होती. पण मी माझ्या प्रेमभंगाचा कलात्मक आविष्कार केला. त्याचप्रमाणे आता प्रेरणाही तिला मिळालेल्या वेदनेतून एक कणखर महिला म्हणून उभी राहात आहे. कोणतीही व्यक्ती जेव्हा जीवघेणा आघात सहन करते, तेव्हाच तिच्या स्वभावाची दुसरी बाजू पुढे येते. एक सशक्त आणि कणखर महिला म्हणून उभी राहण्यास प्रेरणाला अशा प्रेमभंगाच्या धक्क्याची गरज होती.”

यासंदर्भात एरिका फर्नांडिस म्हणाली, “प्रेमभंग हा प्रेरणाच्या नव्या प्रवासाचा प्रारंभ आहे.  ती कोसळून पडत नाही किंवा सैरभैर होत नाही. उलट ती आपले अधिकार आणि प्रेमासाठी संघर्ष करते. ती लवकरच एक शक्तिशाली महिला म्हणून उभी राहील; कारण तिच्यात चिकाटी आणि शक्ती यांचा उत्कृष्ट संगम झाला आहे. प्रेरणा ही आजच्या काळातील महिलांचं उत्कृष्ट उदाहरण आहे. आजची आपल्या भूमिकेवर ठाम उभी राहते आणि त्यातूनच ती एक सक्षम महिला म्हणून उभी राहते.”