'बिग बॉस ओटीटी २' विजेता आणि युट्यूबर एल्विश यादव रेव्ह पार्टी प्रकरणामुळे चर्चेत आहे. रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवल्याप्रकरणी नोएडा पोलिसांनी एल्विशला रविवारी(१७ मार्च) अटक केली होती. त्यानंतर एल्विशने पार्टीत सापाचं विष पुरवलं असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर एल्विशला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. एल्विशच्या अटकेनंतर त्याच्या आईवडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
एल्विशला अटक झाल्यानंतर त्याच्या आईवडिलांनी एबीपी न्यूजशी संवाद साधला. यावेळी त्याने मुलगा निर्दोष असल्याचं सांगत भाजपा खासदार मनेका गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एल्विशला पोलिसांनी फक्त चौकशीसाठी बोलवलं होतं. आणि अचानक त्याला अटक करण्यात आली, असं युट्यूबरच्या वडिलांचं म्हणणं आहे. याबाबत त्यांना काहीच कल्पना नव्हती. याबरोबरच एल्विश निर्दोष असल्याचंही त्याचे वडील म्हणाले. एल्विशने गुन्ह्याची कबुली दिल्याच्या माहितीलाही त्यांनी चुकीचं म्हटलं आहे. "त्याने गुन्हा कबुल केला, याचा कोणता व्हिडिओ आहे का? मी एक शिक्षक आहे आणि माझ्या मुलाला चांगले संस्कार दिले आहेत," असंही एल्विशचे वडील म्हणाले.
एल्विशच्या आईवडिलांनी भाजपा खासदार मनेका गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मनेका गांधी यांच्या पीएफए संस्थेचे अधिकारी गौरव गुप्ता यांनी एका एनजीओच्या स्टिंग ऑपरेशननंतर याबाबत पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली होती. त्यामुळे आता मनेका गांधींच्या सांगण्यावरुन एल्विशला अटक केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे.
नोव्हेंबर २०२३ मध्ये रेव्ह पार्टी प्रकरणामुळे एल्विश पहिल्यांदा चर्चेत आला होता. पोलिसांनी नोएडातील सेक्टर ४९ येथे केलेल्या छापेमारीत पाच जणांना अटक केली होती. या ठिकाणी पाच कोब्रा आणि अन्य जातीचे नऊ साप आढळून आले. या छापेमारीत सापांचे विषही पोलिसांना सापडले होते. यामध्ये एल्विश यादवचं नाव समोर आलं होतं.