'बिग बॉस ओटीटी २' विजेता आणि युट्यूबर एल्विश यादव रेव्ह पार्टी प्रकरणामुळे चर्चेत आहे. रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवल्याप्रकरणी नोएडा पोलिसांनी एल्विशला रविवारी(१७ मार्च) अटक केली होती. त्यानंतर एल्विशने पार्टीत सापाचं विष पुरवलं असल्याचं कबुल केल्याची माहिती समोर आली होती. सुरुवातीला एल्विशने गुन्हा कबुल करण्यास नकार दिला होता. पण, पोलिसांनी इंगा दाखवल्यानंतर एल्विशने अखेर त्याचा गुन्हा मान्य केला आहे. आता एल्विशला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
एल्विशने गुन्हा कबुल केल्यानंतर तो रेव्ह पार्टीत सापाच्या विषाचा पुरवठा का करत होता? याचादेखील उलगडा झाला आहे. पोलिसांना यामागचं कारण सांगितलं आहे. एल्विश पैशांसाठी रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवत असल्याचा अंदाज बांधण्यात येत होता. पण, केवळ पैशांसाठी नव्हे तर त्याचा दबदबा निर्माण करण्यासाठी आणि चाहत्यांमध्ये क्रेझ वाढवण्यासाठी एल्विश हे करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. स्वॅग आणि दबदबा निर्माण करण्यासाठी सापाच्या विषाचा पुरवठा करत असल्याचं एल्विशने पोलीस चौकशीत सांगतिल्याची माहिती इंडियन एक्सप्रेसने दिली आहे. कायद्याला घाबरत नसून मनात येईल ते करण्यास न धजावणारा अशी प्रतिमा एल्विशला त्याच्या चाहत्यांमध्ये निर्माण करायची होती, असंही पोलिसांनी सांगितलं.
एल्विशने रेव्ह पार्टीत सापाच्या विषाचा पुरवठा केल्याचे पुरावे असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. त्याने अशा ६ रेव्ह पार्टीमध्ये सापाचं विष पुरवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ज्या लोकांचा यात सहभाग आहे त्यांच्यावरही लवकरच कारवाई केली जाणार आहे.
नोव्हेंबर २०२३ मध्ये रेव्ह पार्टी प्रकरणामुळे एल्विश पहिल्यांदा चर्चेत आला होता. पोलिसांनी नोएडातील सेक्टर ४९ येथे केलेल्या छापेमारीत पाच जणांना अटक केली होती. या ठिकाणी पाच कोब्रा आणि अन्य जातीचे नऊ साप आढळून आले. या छापेमारीत सापांचे विषही पोलिसांना सापडले होते. यामध्ये एल्विश यादवचं नाव समोर आलं होतं.