झी युवावरील 'संगीत सम्राट' या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचे प्रेम लाभले आणि त्यांच्या उदंड प्रतिसादानेच झी युवा 'संगीत सम्राट' या कार्यक्रमाचे २ रे पर्व घेऊन सज्ज झाले आहे. हे नवे पर्व नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले. संगीत सम्राट पर्व दुसरे मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील होतकरू गायक आणि संगीतकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या कार्यक्रमाच्या रूपरेषेत बदल प्रेक्षक अनुभवत आहेत. या नव्या पर्वात स्पर्धक हे नादमधुर सह्याद्री, स्वरमय कोकण, सूरसाज विदर्भ आणि लयदार मराठवाडा या टीम्सचा भाग असणार आहेत आणि या टीम्सचे कॅप्टन्स सावनी रवींद्र,जुईली जोगळेकर राहुल सक्सेना आणि अभिजीत कोसंबी हे हरहुन्नरी गायक असणार आहेत.
या आठवड्यात कार्यक्रमाची सुरुवात कॅप्टन जुईली जोगळेकर आणि परीक्षक आदर्श शिंदे 'कोंबडी पाळली' या दमदार गाण्याने करणार आहेत, तसेच या वेळी चार ही कॅप्टन्स स्टेजवर परफॉर्म करणार आहेत. एका पेक्षा एक उत्तम स्पर्धक सहभागी झालेल्या संगीत सम्राट पर्व २ मध्ये स्पर्धा सुरुवातीपासून अटीतटीची झाली आहे. या आठवड्यात कॅप्टन्स आपल्या टीम मध्ये ७ स्पर्धकांची निवड करणार आहेत. परीक्षक आणि कॅप्टन्सना इंप्रेस करण्यासाठी स्पर्धक त्यांचं १०० टक्के देताना दिसणार आहेत. त्यांच्या गाण्याने प्रभावित होऊन फक्त कॅप्टन्सचं नाहीत तर खुद्द परीक्षक देखील स्पर्धकांची साथ देताना दिसतील.
संगीत सम्राट पर्व १ हा संगीतक्षेत्रातील न भूतो ना भविष्य असा अभूतपूर्व कार्यक्रम घडला आणि महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी त्याचा मनमुराद आनंद घेतला. पर्व १चे विजेतेपद अहमदनगरमधील नंदिनी अंगद गायकवाड आणि अंजली अंगद गायकवाड या दोन सख्ख्या बहिणींनी जिंकले होते.