'सन मराठी'वरील संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी मालिका म्हणजे 'कॉन्स्टेबल मंजू' (Constable Manju Serial). या मालिकेत सत्या व मंजू यांचा विवाहसोहळा २२ मार्चपासून दररोज रात्री ८ वाजता थाटात पार पडताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. लग्नसोहळ्याचे विशेष भाग पाहून प्रेक्षक मालिकेवर भरभरून प्रेम करत आहेत. बॅण्ड बाजा, घोडेस्वारी करत लग्न मंडपात सत्या- मंजूची ग्रँड एन्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या लग्नसराई मध्ये मंजूच्या पारंपरिक वेशभूषेत एक खास गोष्ट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार आहे, ते म्हणजे मंजूने तिच्या ब्लाउजवर 'सत्याची कारभारीण' असं लिहिलं आहे. याचबरोबर सत्याचा लूकही चर्चेचा विषय ठरत आहे.
या लग्न सोहळ्याबद्दल प्रेक्षकांचा लाडका सत्या म्हणजेच अभिनेता वैभव कदम म्हणाला की, 'कॉन्स्टेबल मंजू' या मालिकेवर प्रेक्षक खूप खुश आहेत कारण त्यांच्या लाडक्या जोडीचं लग्न पार पडत आहे. १८ मार्च २०२५ रोजी मालिकेला एक वर्ष पूर्ण झालं आणि वर्षभरापासून सत्या आणि मंजूमधील भांडण त्यांच्यातला दुरावा त्यांच्यात येणारे अडथळे हे सगळं बघून झाल्यानंतर आता फायनली सत्या आणि मंजू एकत्र येणार त्यामुळे प्रेक्षकांना छान वाटतं आणि मला वाटतं की ते याच क्षणाची आतुरतेने वाट बघत होते त्यामुळे आता ते फायनल एकत्र येणार याचा त्यांना खूप आनंद आहे. ही मालिका आमची नसून खऱ्या अर्थाने प्रेक्षकांची झाली आहे. सध्या मालिकेचं शूटिंग खूप धकाधकीचं सुरु आहे.
यापुढे तो म्हणाला की, खऱ्या आयुष्यात लग्न करणं सोपं आहे पण मालिकेत नाही असं मी म्हणेन कारण, मालिकेतलं लग्न हे ४-५ दिवस सुरु असतं. एकच शॉट अनेकदा द्यावा लागतो. पण या सगळ्यात चेहऱ्यावरचे हास्य, उत्साह तोच ठेवावा लागतो. अश्या मोठ्या समारंभात स्वतःचा चेहरा फ्रेश ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी पुरेशी झोप, योग्य आहार खूप महत्त्वाचा आहे. मन समाधानी आणि आनंदी असेल तर चेहऱ्यावर आपसूक हसू येत. मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत म्हणून कामाचा कधीच कंटाळा येत नाही. या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. प्रेक्षकांना हे भाग पाहताना खूप धमाल येणार आहे. आणि अखेर मंजू सत्याची झाली यामुळे सगळे खूप खुश आहेत. यापुढे मालिकेत आणखी ट्विस्ट येणार आहेत. प्रेक्षकांनी असच आमच्यावर प्रेम करत राहावं. आम्ही प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात कमी पडणार नाही.