Join us

टेलिव्हिजनवर काम करणे एन्जॉय करतेयः आकांक्षा पुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 4:01 AM

आकांक्षा पुरीने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे सगळेच दाक्षिणात्य चित्रपट गाजले आहेत. ती मधुर भांडारकरच्या कॅलेंडर गर्ल्स ...

आकांक्षा पुरीने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे सगळेच दाक्षिणात्य चित्रपट गाजले आहेत. ती मधुर भांडारकरच्या कॅलेंडर गर्ल्स या चित्रपटात देखील झळकली होती. आता ती पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर झळकणार आहे. विघ्नहर्ता गणेश या मालिकेत ती पार्वतीच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या या नव्या इनिंगबाबत तिच्याशी मारलेल्या गप्पा...आकांक्षा तुझ्या कुटुंबियातील कोणीच बॉलिवूड इंडस्ट्रीशी संबंधित नसताना तू या क्षेत्रात कशी आलीस?माझे वडील हे पोलिस खात्यात आहेत तर माझी आई ही प्रसिद्ध ज्योतिषी आहे. त्यामुळे माझा या चित्रपटसृष्टीशी काहीही संबंध नाहीये. मी किंगफिशर एअरलाइन्समध्ये एअर होस्टेस म्हणून काम करत होती. त्याचवेळी मला काही जाहिरातींच्या ऑफर आल्या. मी केवळ काहीच महिन्यात दक्षिणेतील अनेक प्रसिद्ध ब्रँड्ससोबत काम केले. त्यानंतर मला तामीळ चित्रपटाबद्दल विचारण्यात आले आणि अशाप्रकारे चित्रपटसृष्टीतील माझा प्रवास सुरू झाला. पहिला चित्रपट स्वीकारल्यानंतर मी लगेचच माझी नोकरी सोडली. अभिनयक्षेत्रात यायचे हे तू कधी ठरवलेस?खरे तर मला अभिनयाची आवड ही लहानपणापासूनच होती. पण मी मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे लहानाची मोठी झाली आहे. तुम्ही एखाद्या छोट्या शहरातील असाल तर तुम्हाला चित्रपटसृष्टीत जम बसवणे खूप कठीण जाते. त्यामुळे मी अभिनेत्री बनण्याचे स्वप्न सोडून दिले होते. पण मी एअर होस्टेस म्हणून काम करत असताना मला एक चांगली संधी मिळाली आणि त्य संधीचे मी सोने केले. विघ्नहर्ता गणेश या मालिकेतील पार्वतीच्या भूमिकेबद्दल तुला विचारण्यात आल्यानंतर तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती?मला मालिकेच्या टीमकडून फोन आला त्यावेळी मी प्रचंड खूश झाले होते. तुम्हाला नक्की मलाच फोन करायचा होता ना, तुमच्याकडून काही चूक तर होत नाहीये ना असे मी त्यांना विचारले होते. फोनवर आमचे बोलणे झाल्यानंतर सर्वप्रथम माझी लूक टेस्ट घेण्यात आली आणि त्यानंतर मला या भूमिकेविषयी सांगण्यात आले. माझ्या घरात अतिशय धार्मिक वातावरण असल्याने मला पार्वती, महाकाली यांच्याविषयी चांगलेच माहिती आहे. त्यामुळे या भूमिकेसाठी मला वेगळा काही अभ्यास करावा लागला नाही. मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यापूर्वी या मालिकेसाठी आमची काही वर्कशॉप्स घेण्यात आली. त्यामुळे माझी भूमिका मला समजण्यास अधिक मदत झाली. पौराणिक मालिकांमधील भाषा ही खूपच वेगळी असते. त्यामुळे सध्या मी भाषेवर खूपच मेहनत घेतली.तू चित्रपट आणि मालिका या दोन्ही माध्यमांमध्ये काम केले आहेस, दोन्ही माध्यमांचा अनुभव कसा आहे?चित्रपटात तुम्हाला चित्रीकरणासाठी खूप सारा वेळ मिळतो. तर दुसरीकडे मालिकेसाठी तुम्हाला दिवसातील १२-१४ तास चित्रीकरणासाठी द्यावे लागतात. पण मालिकेत काम करताना तुम्हाला खूप काही शिकायला मिळते. मी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण चित्रपटांपेक्षा अधिक गोष्टी मी केवळ एका मालिकेमुळे शिकले. मालिकेचे चित्रीकरण करताना वेळेचे बंधन असल्याने प्रत्येक जण एका दडपणाखाली काम करत असतो. पण हे सगळे मी एन्जॉय करत आहे. या मालिकेतील भूमिकेसाठी तुला मेकअप करायला खूप वेळ लागतो असे ऐकले आहे, हे खरे आहे का?या मालिकेत मी खूप सारी आभुषणं घालते. तसेच माझी वेशभूषा, केशभूषा ही खूपच वेगळी आहे. त्यामुळे मला मेकअप करायला जवळजवळ दोन तास लागतात. तसेच मालिकेत मी महाकालीच्या रूपात असल्यास तर त्यापेक्षाही अधिक वेळ लागतो. कारण या रूपासाठी माझ्या संपूर्ण अंगाला रंग लावला जातो.