'रंग माझा वेगळा' मालिकेत झाली या अभिनेत्रीची एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
By तेजल गावडे | Published: August 5, 2021 06:06 PM2021-08-05T18:06:49+5:302021-08-05T18:07:31+5:30
'रंग माझा वेगळा' मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळाने कमी कालावधीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. या मालिकेतील सौंदर्या, ललित, दीपा, कार्तिक या सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. सध्या मालिका उत्कंठावर्धक वळणावर पोहचली आहे. आता या मालिकेत एका नवीन अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.
रंग माझा वेगळा मालिकेत दीपाला जुळ्या मुली झाल्या आहेत. मात्र तिला एक मुलगी दगावल्याचे सांगितले जाते आणि श्वेतामुळे तिच्या आणि बाळाच्या जीवाला धोका असल्यामुळे ती एका मुलीला घेऊन हॉस्पिटलमधून पळून जाते. त्यानंतर तिला एक तरूणी आसरा देताना दिसते. ही तरूणी म्हणजे अश्विनी. अश्विनी दीपाला आणि तिच्या बाळाला आपल्या घरी घेऊन जाते. इतकेच नाही तर ती त्यांची काळजी घेताना दिसते. सख्खी बहिण नसतानाही इतकी माया आणि काळजी घेणाऱ्या अश्विनीवर दीपा भारावून जाते.
आता ही अश्विनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. तर अश्विनीची भूमिका साकारली आहे अभिनेत्री वैशाली राहुल भोसले हिने. या मालिकेच्या आधी ती चंद्र आहे साक्षीला या मालिकेत मिताली आचरेकरच्या भूमिकेत झळकली होती.
वैशालीने मालिका व नाटक अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. वैशालीने तिच्या कारकीर्दीची सुरूवात छोट्या पडद्यापासून केली. ई टीव्हीवरील ब्रह्मांडनायक या गजानन महाराजांवर आधारित मालिकेत तिने काम केले आहे. याशिवाय तिने बऱ्याच मालिकेत काम केले आहे. स्टार प्रवाहवरील लक्ष्य, बंध रेशमाचे मालिकेत कॅरेक्टर रोल केले आहेत. झी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टारमध्ये ती झळकली होती.
याशिवाय कलर्स मराठी वरील तू माझा सांगातीमध्ये तिने भानुबाई आणि द्वारकाची भूमिका केली. या मालिकेत तिने साकारलेली दोन्ही पात्रे निगेटिव्ह होते. पण, या मालिकेतील भानूबाईच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली.
याशिवाय वैशालीने चित्रपटातही काम केले आहे. यात मिलिंद शिंदे लिखित दिग्दर्शित नाच तुझंच लगिन हाय या चित्रपटात काम केले. रमेश मोरे लिखित आणि दिग्दर्शित टॉपर या सिनेमात ती झळकणार आहे.
तसेच तिने हृषिकेश कोळी लिखित-दिग्दर्शित वर खाली दोन पाय या प्रायोगिक नाटकाची निर्मिती करत निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केले आहे.